“नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अॅम्बेसेडर”; नितेश राणेंचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 04:38 PM2021-10-23T16:38:04+5:302021-10-23T16:39:20+5:30
मुख्यमंत्र्यांच्याच पायगुणामुळे राज्यावर अनेक संकटे आली, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
सिंधुदुर्ग: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील बडा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या कारवाईवर मोठे प्रश्न उपस्थित करून ही प्रकरण फेक असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, या प्रकरणात न्यायालयाने आर्यन खानला जामीन नाकारल्यामुळे त्याचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही आर्यन खानच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक पाकिस्तानचे एजंट असून, पाकिस्तानमधील ड्रग्ज माफियांचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
नितेश राणे सिंधुदुर्गात मीडियाशी बोलत होते. नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट झालेले आहेत. पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ते ब्रँड अॅम्बेसेडर झाले आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे, हे त्यांना कळत नाही, या शब्दांत नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केला.
मराठी माणसांविषयी शिवसेनेला काहीच पडलेले नाही
शिवसेनेची सत्ता असताना समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे. मराठी माणसांविषयी शिवसेनेला काहीच पडलेले नाही. मुंबईमध्ये स्वतःला हिंदू म्हणवून घेणे हे पाप झाले आहे. ठाकरे सरकारच नाव बदलून बेईमान सरकार नाव ठेवायला हवे, असा टोला लगावत पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कसे कसे आणि कोणाकडून हफ्ते घेतात हे मी अस्लम शेख यांना पत्र लिहून कळवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. आमच्याकडे पुरावे आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
क्या हुआ तेरा वादा असे विचारावस वाटतेय
मराठवाडा, विदर्भ किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न पडला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना ५० हजार देणार असे वचन दिले गेले होते. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा असे विचारावसे वाटत आहे. विरोधीपक्षात असताना हीच मंडळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तोडफोड करून आले होते. आता तोडपाणी झाली नाही ना, अशी विचारणा नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केली.
दरम्यान, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. ड्रग्सबद्दल बोलायचे, एनसीबीबद्दल बोलायचे, पण शेतकऱ्यांना बद्दल बोलायचे नाही. दिवसभर फक्त वसुली करायची हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या वाईट स्थितीला उद्धव ठाकरे आणि हे सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रातला शेतकरी ठाकरे सरकार आल्यापासून अंधारात आहे. मुख्यमंत्र्यांच्याच पायगुणामुळे राज्यावर अनेक संकटे आली, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.