सेना-राष्ट्रवादीला टक्कर देण्यास भाजपही सज्ज

By Admin | Published: April 16, 2015 11:26 PM2015-04-16T23:26:10+5:302015-04-17T00:05:24+5:30

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली होती. त्यातील चिपळूण मतदार संघातील ४४ ग्रामपंचायती भाजप लढवत आहे.

BJP ready to fight Army-NCP | सेना-राष्ट्रवादीला टक्कर देण्यास भाजपही सज्ज

सेना-राष्ट्रवादीला टक्कर देण्यास भाजपही सज्ज

googlenewsNext

चिपळूण : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व राखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे मतदारांना तिसरा राजकीय पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील चित्र पाहता भाजपाविरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत गावात आहे.
केंद्रातील विजयानंतर अनपेक्षितपणे राज्यात भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत प्रथम क्रमांक मिळवला. चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेला भाजप एकदम पहिल्या क्रमांकावर गेल्यानंतर राजकारणातील चित्र बदलले आहे. पंधरा वर्षांनंतर सत्ता हातात आल्यामुळे सत्तेचा उपयोग करुन ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. सभासद नोंदणीसह पक्षाचे विविध उपक्रम सुरु झाले आहेत. त्यामुळे एकूणच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली होती. त्यातील चिपळूण मतदार संघातील ४४ ग्रामपंचायती भाजप लढवत आहे. यापैकी ४ ग्रामपंचायती भाजपने बिनविरोध निवडून आणल्या आहेत. २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ५५ गावांमध्ये निवडणुका सुरु आहेत. तसेच सत्तेचा उपयोग करुन स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
भाजपकडे तालुका पातळीवर सक्षम कार्यकर्ता नसतानाही ग्रामपंचायतीमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही माधव गवळी यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू ठेवले असल्याने अनेक युवक भाजपशी जोडले जात आहेत. ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते गाव पातळीवर भाजपचे पॅनल तयार करुन निवडणुकीच्या रणांगणात दंड थोपटून उभे आहेत. गाव पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भर दिला जात आहे. भाजपेतर कार्यकर्ते व नेते मंडळी भाजपशी जवळीक साधून पाठिंबा देत आहेत. त्यामुळे भाजप या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: BJP ready to fight Army-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.