कंगनाचा निषेध ठराव भाजपने फेटळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:55 PM2021-11-26T17:55:14+5:302021-11-26T17:56:32+5:30
सावंतवाडी : देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या निषेधाच्या ठरावावरून सावंतवाडी नगरपालिका बैठकीत सत्ताधारी व विरोधकात ...
सावंतवाडी : देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या निषेधाच्या ठरावावरून सावंतवाडी नगरपालिका बैठकीत सत्ताधारी व विरोधकात चांगलीच तू-तू..मै-मै झाली. अखेर शिवसेना गटनेत्यांनी मांडलेल्या या ठरावाला भाजपने विरोध केला. न्यायालयाकडून यासंदर्भात टिप्पणी करून तिला दोषी ठरवले जात नाही तोपर्यंत असा ठराव घेता येत नाही असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले.
नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नगरपालिकेची खास सभा येथील लोकमान्य सभागृहात टिळक सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, नासिर शेख, सुरेंद्र बांदेकर, सुधीर आडिवरेकर, माधुरी वाडकर, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते.
माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या भूखंडावर जुन्या आरक्षणात बदल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही सुचना केल्या आहेत असे नगराध्यक्ष यांनी सभागृहात सांगितले. पण यावर नगरसेविका लोंबो यांनी आक्षेप घेतला. आतापर्यंत तीन वेळा सभागृहात हा ठराव आला. त्यात वेळोवेळी बदल करण्यात येतो हे सभागृहास शोभादेणारे नसून आपल्या प्रशासनाकडून योग्य तो ठराव करूनच तो सभागृहा समोर आला पाहिजे असे मत लोंबो यांनी व्यक्त केले.
तर बाप्पा नार्वेकर व्यापारी संपादनातील बंद असलेला गाळा क्रमांक दहा भाडेपट्ट्याने मिळण्याबाबत रतन भोसले यांनी केलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आली. संबंधित गाळा भाड्याने देताना योग्य ती चौकशी करून भाडेपट्टी आकारण्यात यावी असे उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी स्पष्ट केले.
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या निषेध ठरावावर सत्ताधारी नगरसेवकांनी लोंबो यांना कोंडीत पकडले. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये या विषयावरून तू-तू.. मै-मै झाले पण नंतर त्यात नगराध्यक्ष परब यांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा पाडला.