मॉल उभारण्यावरून भाजप-शिवसेनेत झाली जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:49 PM2020-09-11T14:49:17+5:302020-09-11T14:54:20+5:30
अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभारण्याचा ठराव नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी विशेष बैठकीत मांडला. मात्र, या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही तो ठराव सत्ताधाऱ्यांनी नऊ विरुद्ध तीन मतांनी जिंकला.
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या जुन्या कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीच्या जागेवर २४ गुंठे क्षेत्रात अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभारण्याचा ठराव नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी विशेष बैठकीत मांडला. मात्र, या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही तो ठराव सत्ताधाऱ्यांनी नऊ विरुद्ध तीन मतांनी जिंकला.
या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. तसेच ही सभा बेकायदेशीर असल्याचे शिवसेनेच्या गटनेत्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी सांगितले. तर नगराध्यक्ष नगराध्यक्ष संजू परब यांनी २५ वर्षांनंतर शॉपिंग कॉम्प्लेस उभारण्यास नगरपरिषदेच्या बैठकीत बहुमताने संमती दिली गेली असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले.
सावंतवाडी नगरपरिषद कौन्सिलची विशेष सभा नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह नगरसेविका दीपाली भालेकर, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, राजू बेग, नासीर शेख, बाबू कुडतरकर, भारती मोरे, अनारोजीन लोबोे, मनोज नाईक, डॉ. जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.
या सभेच्या सुरुवातीलाच आॅनलाईन सभा असल्याने ती आॅफलाईन कशासाठी घेतली जात आहे. याकडे शिवसेना नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी लक्ष वेधले. मात्र, नगराध्यक्ष परब यांनी या सभेचे समर्थन करीत सभा सुरू केली.
यावेळी अनारोजीन लोबो यांनी कोरोनाच्या साथीमुळे दोन नगरसेवक उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांना आॅनलाईन चर्चा करण्याची परवानगी दिली जावी, याकडे नगराध्यक्ष परब यांचे लक्ष वेधले. मात्र, नगराध्यक्षांनी त्याला नकार दिला.
यावेळी अनारोजीन लोबो यांनी आॅनलाईन सभा घेत असल्याचे कळविले आणि आता आॅफलाईन सभा घेत आहात असे सांगत सभा बेकायदेशीर आहे असे म्हटले. तीस वर्षे बीओटी तत्त्वावर मॉल उभारण्याची परवानगी दिल्यास नंतर ती इमारत जुनी होणार आहे. त्यामुळे याचा सर्वप्रथम विचार व्हायला हवा, असे लोबो म्हणाल्या.
व्हीप बजावूनही सहा सदस्यांची अनुपस्थिती
बाबू कुडतरकर यांनी वीज वितरणच्या जागेबाबत योग्य खुलासा करा याकडे लक्ष वेधले. तर अनारोजीन लोबो यांनी याठिकाणी असणारे भाडेकरू उद्ध्वस्त होतील असे सांगत बीओटी तत्त्वावर मॉल उभारण्यास विरोध केला. मात्र, ठराव मतदानासाठी घेतला. त्यावेळी सत्ताधारी नऊ नगरसेवकांनी मॉल उभारण्याच्या ठरावाला पाठिंबा दर्शविला तर शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी मॉल उभारण्यास विरोध दर्शविला.
मात्र, लोबो यांच्या शिवसेना-भाजपा गटातील व्हीप बजावूनदेखील सहा सदस्यांनी अनुपस्थिती दर्शविली. हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागू, असे लोबो म्हणाल्या.
नगरसेवक राजू बेग यांनी कामगार कल्याणच्या २४ गुंठे जागेमध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेस उभारण्याबाबत ठराव मांडला. राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक करण्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर नसल्याने बीओटी तत्त्वावर मॉल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्या ठिकाणी वीज कंपनीची जागा वगळून तो उभारला जाईल याकडे राजू बेग यांनी लक्ष वेधले.
मात्र, लोबो यांंनी जमिनीच्या ठिकाणी काही अडचणी आहेत. जुने गाळे भाड्याने दिले आहेत. खासगी जमीन आहे. याबाबत चर्चा व्हायला हवी आणि बांधा, वापरा व हस्तांतरित करा याचा नगरपरिषदेस काय फायदा होणार? असे विचारले.