भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये जि. प. सर्वसाधारण सभेत शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:11 PM2021-02-17T17:11:51+5:302021-02-17T17:14:30+5:30
Zp Kankavli Sindhudurg- कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी जिल्हा परिषद अखत्यारितील जागा देण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी सदस्य यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.
ओरोस : कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी जिल्हा परिषद अखत्यारितील जागा देण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी सदस्य यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.
जिल्हा परिषद मालकीची इमारत निर्लेखित करून स्मारक बांधण्यात यावे, असा शिवसेना सदस्यांनी आग्रह धरला, तर स्मारक बांधण्यासाठी आपला कोणताही विरोध नाही, पण जिल्हा परिषदेची इमारत असल्याने ती इमारत कशाप्रकारे वापरात राहील याबाबत शहानिशा करून स्मारक बांधण्यासाठी जमीन द्यावी, अशी मागणी भाजप सदस्यांनी केली.
यावर पुन्हा सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे सभागृहातील वातावरण गरम झाले होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी..च्या घोषणा सभागृहात सुरू झाल्या व सभागृह दणाणून गेले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची खास सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, सदस्य रणजित देसाई, नागेंद्र परब, संतोष साटविलकर, अमरसेन सावंत, प्रदीप नारकर, अंकुश जाधव, संजय आंग्रे, गणेश राणे, अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.
२३ गुंठ्यापैकी काही गुंठे जागा महामार्ग चौपदरीकरणात गेली आहे. त्यामुळे आता त्याठिकाणी निश्चित किती गुंठे जागा आहे ते तपासणे आवश्यक आहे. सभागृहात झालेल्या चर्चेअंती जागेची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल पुढील सभेत ठेवण्यात यावा आणि मगच स्मारकाबाबत निर्णय घेण्यात यावा, असा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा विषय पुढील सभेपर्यंत लांबला आहे.
आमचा महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही : देसाई
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होणार असल्याने ती जागा त्वरित स्मारकासाठी देण्यात यावी यात कोणतेही राजकारण करण्यात येऊ नये, असे शिवसेना सदस्य नागेंद्र परब यांनी सांगितले. यावर भाजप सदस्य रणजित देसाई यांनी आमचा महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही. ते व्हावे ही आमचीही इच्छा आहे. पण त्या ठिकाणी असलेली इमारत खरोखरच पाडणे आवश्यक आहे का ? सद्यस्थितीही तेथे किती जागा उपलब्ध आहे याबाबत पाहणी होणे आवश्यक असून, त्यानंतरच यावर प्रशासनाने निर्णय घावा, असे भाजप सदस्य रणजित देसाई यांनी सांगितले. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या शाब्दिक द्वंद्व झाले.
...आणि सभागृह दणाणले
कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्याच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपा आणि विरोधी शिवसेना सदस्य यांच्यावर शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच या स्मारक बांधण्यासाठी जमीन द्यावी की नाही हे प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्यात येईल, असे सभागृहात स्पष्ट झाले. त्यामुळे हा मुद्दा पुढील जिल्हा परिषद सभेसमोर गेला. दरम्यान, सदस्य अंकुश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणा दिल्या. याला सर्वच सदस्यांनी प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेच्या घोषणांनी जिल्हा परिषद सभागृह दणाणून गेले.