सिंधुदुर्गात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:35 AM2021-01-14T11:35:58+5:302021-01-14T11:37:25+5:30
gram panchayat Election Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप व शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून विविध ठिकाणी पक्षप्रवेशाचे सोहळे आयोजित केले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींवर वर्चस्व कोणाचे ? याबाबत आरोप- प्रत्यारोप रंगत आहेत. त्यामुळे एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेत पक्षवाढीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप व शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून विविध ठिकाणी पक्षप्रवेशाचे सोहळे आयोजित केले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींवर वर्चस्व कोणाचे ? याबाबत आरोप- प्रत्यारोप रंगत आहेत. त्यामुळे एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेत पक्षवाढीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे हे पक्ष आपापल्यापरीने पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. पण, आगामी काळात शिवसेनेला धक्के देत महत्त्वाची सत्तास्थाने ताब्यात घेण्याची भाजपची छुपी यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच पक्षप्रवेश नाट्ये रंगत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे दोन तर भाजपचे एक आमदार कार्यरत आहेत. जिल्ह्यात महत्त्वाचे सत्तास्थान असलेली जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या तालुक्यातील पंचायत समितीवरही भाजपने आपला झेंडा रोवला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीही भाजपच्या ताब्यात आहेत. त्या आपल्या ताब्यात याव्यात यासाठी शिवसेना प्रयत्न करीत आहे.
भाजपाचे खासदार नारायण राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नीतेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपने वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यात आता माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांची साथ त्यांना लाभत आहे.
खासदार विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते असे नेते शिवसेना वाढीसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगत असतात.
इतर पक्षांचे कार्यकर्ते नाराज
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून राज्यस्तरावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी कधी प्रत्यक्ष तर कधी छुपी दिसून येत आहे. त्याचा परिणामही जिल्हास्तरावर होत असून शिवसेनेकडून महाविकास आघाडीतील इतर पक्षांना आवश्यक तेवढे महत्त्व दिले जात नसल्याने इतर पक्षांचे कार्यकर्ते नाराज आहेत.