संगमेश्वरात भाजपला धक्का

By admin | Published: July 8, 2016 10:41 PM2016-07-08T22:41:55+5:302016-07-09T00:48:01+5:30

सूर्यकांत साळुंखेंचा राजीनामा : कारण मात्र गुलदस्त्यात

BJP shocks Sangameshwar | संगमेश्वरात भाजपला धक्का

संगमेश्वरात भाजपला धक्का

Next

देवरूख : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सूर्यकांत साळुंखे यांनी आपल्या भाजपमधील पदांचा राजीनामा सादर केल्याने चिपळूण - संगमेश्वरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. साळुंखे यांच्या अचानक राजीनाम्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
सूर्यकांत साळुंखे हे प्रसिध्द उद्योजक असून, ते संगमेश्वर तालुक्याचे सुपुत्र आहेत. सन २००९ साली मनसेकडून त्यांनी चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत १५ हजारपेक्षा अधिक मते घेतली होती. यानंतर ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. मनसेचे सहसंपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मनसेवाढीत साळुंखे यांचा मोठा वाटा होता. सहा वर्षे मनसेत काम केल्यानंतर पक्षांतर्गत कुरबुरीमुळे कंटाळलेले साळुंखे यांनी मनसेला रामराम केला होता. चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये असलेला त्यांचा दांडगा संपर्क पाहून त्यांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
माजी आमदार विनय नातू आणि जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या भेटीनंतर साळुंखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही तालुक्यातील आपल्या असंख्य समर्थकांसह ते सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले. त्यांच्या प्रवेशाने दोन्ही तालुक्यातील भाजपला चांगलीच बळकटी मिळाली.
प्रवेशानंतर काहीच दिवसात जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली तर त्यानंतर काहीच दिवसात त्यांना चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख करण्यात आले.
यानंतर साळुंखे यांनी आपल्या कामाचा जोर वाढवला होता. जिल्हा कार्यकारिणीसह स्थानिक भागात बैठका घेत त्यांनी आपल्या समर्थकांना एकमार्गी भाजपमध्ये आणण्याचा सपाटा लावला होता. एवढे सारे सुरळीत सुरू असताना दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या दोनही पदांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याकडे सादर केला आहे. अद्याप तो मंजूर झाला नसला तरी साळुंखे यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण तरी काय? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.
राजीनाम्यामध्ये साळुंखे यांनी आपण पदांसाठी जास्त वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले असून, भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहू, असे नमूद केल्याने ते पक्ष सोडणार नाहीत हे निश्चित झाले आहे. मात्र, राजीनाम्याचे खरे कारण काय? याबाबत चर्चेला ऊत आला आहे. याबाबत साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)


काही महिन्यातच रामराम... : विविध चर्चांना ऊत
मनसेतून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सूर्यकांत साळुंखे यांना भाजपने प्रयत्न करून आपल्या पक्षात ओढले. त्याला काही दिवस लोटले असताना त्यांनी आपल्या पदांना रामराम ठोकला. त्यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे. भाजपला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

राजीनामा अद्याप मंजूर नाही.
जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याकडे केला राजीनामा सुपूर्द.
पदांसाठी जास्त वेळ देऊ शकत नाही : साळुंखे.

Web Title: BJP shocks Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.