माझ्या कारकिर्दीची चिंता भाजपने करु नये: भास्कर जाधव
By संदीप बांद्रे | Published: October 21, 2022 11:04 PM2022-10-21T23:04:54+5:302022-10-21T23:05:04+5:30
माझ्या राजकीय कारकिर्दीची भाजपने चिंता करू नये. माझी राजकीय कारकीर्द ढाण्या वाघासारखी आणि सन्मानानेच संपेल, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
चिपळूण :
माझ्या राजकीय कारकिर्दीची भाजपने चिंता करू नये. माझी राजकीय कारकीर्द ढाण्या वाघासारखी आणि सन्मानानेच संपेल, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. आमदार जाधव शुक्रवारी चिपळुणात दाखल हाेताच त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लाेषात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द लवकरच संपेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत केले. या विषयावर त्यांना विचारले असता त्यांनी आपली कारकीर्द सन्मानाने संपेल असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, ज्या ज्या वेळी माझ्यावर आघात होता, त्या त्यावेळी माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहतात. मी चाळीस वर्षे राजकारणात आहे. मला कधीही गर्दी जमा करावी लागली नाही. आज माझ्या स्वागताला ४० वर्षांपासूनचे जुने कार्यकर्ते आणि नवीन पिढीतील कार्यकर्तेही उपस्थित आहेत.
कुणी शिवसेनेच्या फलकाला हात लावला किंवा भगव्याची विटंबना केली तर हात मोडून टाकू, ही बाळासाहेबांची भाषणे आम्ही ऐकली आहेत. मात्र, अलीकडे कुवत आणि अधिकार नसलेले अतिशय खालच्या पातळीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. ४० आमदार फोडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यातील कार्यकर्ते तळमळत होते. मी त्यांच्या मनातला आवाज ऐकून कार्यकर्त्यांना साद घातली. त्यामुळे राज्यात भगवे वातावरण निर्माण झाले आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.