सिंधुदुर्गात भाजपा-ठाकरे गटात राडा: दोन्ही गटांकडून तक्रारी दाखल, २५-३० जणांविरोधात गुन्हा
By सुधीर राणे | Published: January 25, 2023 12:49 PM2023-01-25T12:49:13+5:302023-01-25T12:49:50+5:30
कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल
कणकवली: कनेडी येथे शिवसेना व भाजप कार्यकत्यांमध्ये मंगळवारी झालेल्या राड्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात शिवसेना कार्यकर्ता कुणाल सावंत याच्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह चौघांवर, तर गोट्या सावंत यांच्या तक्रारीनुसार शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश सावंत यांच्यासह २५- ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल सावंत (सांगवे) याच्या तक्रारीनुसार, तो कनेडी बाजारपेठ येथे रिक्षा चालवतो. कनेडी बाजारपेठ येथे भाजपतर्फे माघी गणेशजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी सुरु आहे. काल, मंगळवारी सकाळच्या सुमारास कुणाल बाजारपेठेत रिक्षा लावून तेथील एका किराणा दुकानात जात होता. त्यावेळी संदेश उर्फ गोटया सावंत यानी 'तू तुझी रिक्षा सारखी वर-खाली घेऊन जात आहेस. त्यामुळे आमच्या गणेश जयंती कार्यक्रम तयारीत अडथळा येत आहे.' असे म्हटले. त्यावर कुणाल याने मला भाडे असेल, तर मी रिक्षा घेऊन जाणारच' असे सांगितले.
त्यानंतर गोट्या सावंत यानी कुणालचा हात पिरगळत, कानाखाली मारली. कुणालने पळण्याचा प्रयत्न केला असता प्रफुल्ल काणेकर, मंगेश बोभाटे, किशोर परब यांनी पकडून काठीने मारहाण केली. संशयितांनी कुणालला ठार मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे.
संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या तक्रारीनुसार, भाजप विभागीय कार्यालयाजवळ माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंत हे कनेडी येथील भाजप कार्यालयाकडे जात होते, तेव्हा कुणाल रिक्षामधून सातत्याने फेऱ्या मारत होता. याबाबत गोट्या सावंत यांनी विचारणा केली असता कुणाल याने खुन्नस दिली व बाचाबाची केली.
त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, पंचायत समिती माजी सदस्य मंगेश सावंत, कुणाल सावंत, योगेश वाळके, अविनाश सावंत, मुकेश सावंत, उत्तम लोके, राजू पाटील, संदीप गावकर, पद्माकर पांगम यांच्यासह २५ - ३० जण भाजप कार्यालयात आले. त्यांनी कुणाल सावंत याला मारहाण केल्याबाबत गोट्या सावंत यांना जाब विचारत धक्काबुक्की केली असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.