भाजपा पारंपरिकच्या पाठिशी
By Admin | Published: December 4, 2014 11:03 PM2014-12-04T23:03:43+5:302014-12-04T23:39:03+5:30
अतुल काळसेकरांची माहिती : पारंपरिक, पर्ससीन मच्छिमारांमधील वाद
मालवण : पारंपरिक आणि पर्ससीनमधील वाद नवा नाही. परंतु यापूर्वी शासनाने म्हणा किंवा लोकप्रतिनिधींनी हा वाद मिटविला नाही. केवळ मतांच्या राजकारणासाठी मच्छिमारांचा वापर केला. त्याचाच फायदा मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेवून अनधिकृत मासेमारीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करताना भाजपा पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत आणि बिगर परवाना बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई न केल्यास शासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही काळसेकर यांनी यावेळी दिला. मालवण येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, राजू राऊळ, जयदेव कदम, प्रभाकर सावंत, भाऊ सामंत, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना काळसेकर म्हणाले, गेले चार दिवस सुरू असलेला सिंधुदुर्गातील मच्छिमारांचा संघर्ष अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे सिंधुदुर्गातील किनारपट्टी कधी नव्हे एवढी अशांत झाली आहे. पारंपरिक गिलनेट मच्छिमार आणि पर्ससीन मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांमधील वाद नवा नाही. मात्र, सातत्याने या वादाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे.
यापुढे सिंधुदुर्गच्या संपूर्ण किनारपट्टीवरील सर्वच मच्छिमार नौकांच्या परवाना आणि इतर कायदेशीर बाबींची तातडीने तपासणी करून अनधिकृत आणि बिगर परवाना बोटींवर मत्स्य विभागाने महसूल व पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई करावी. या कामात अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाल्यास अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सरकारकडून कारवाई करण्यात येईल, असे काळसेकर म्हणाले.
समुद्र हा कोणाच्या बापाचा नसला तरीही गेल्या अनेक पिढ्यांपासून मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या त्या त्या भागातील मच्छिमारांचा तो हक्क आहे. अशा हक्काच्या उदरनिर्वाहावर जर आधुनिकिकरणाच्या नावावर कुणी गदा आणत असेल तर अवैध पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बेकायदेशीर आधुनिक करणाला विरोध राहील. सिंधुदुर्गात शेकडो बोटींना परवाने नाहीत ही बाब गंभीर आहे. अशा बिगर परवाना बोटींचा एखाद्या गुन्ह्यासाठी किंवा देशविघातक कृत्यासाठी वापर केला जावू शकतो. ही बाब सिंधुदुर्ग प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या आतापर्यंत लक्षात कशी आली नाही? असा सवालही काळसेकर यांनी उपस्थित केला. निवती समुद्रात दगडफेकीचा प्रकार हा दोन्ही बाजु्च्या मच्छिमारांनी एकमेकांना आव्हान देण्यातून झाला. वृत्तपत्रातून आधी दोन दिवस असे आव्हान देण्याचे प्रकार सुरू असताना पोलीस आणि मत्स्य विभागाने याचे गांभिर्य ओळखले नाही आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, असे काळसेकर म्हणाले.
दरम्यान, निवती येथील पर्ससिनधारक मच्छिमारांनी गुरुवारी दुपारनंतर गेले दोन दिवस पोलीस ठाण्यासमोर छेडलेले ठिय्या आंदोलनही मागे घेतल्याने आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. प्रशासनानेदेखील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)
निवतीतील मच्छिमारांचे आंदोलन स्थगित
सोमवारी सायंकाळी पर्ससीननेट व पारंपरिक मच्छिमारीवरून मालवण व निवती मेढा येथील मच्छिमारामंमध्ये भर समुद्रात एकमेकांवर दगडफेक झाली होती. याप्रकरणी पोलीस हल्लेखोरांना अटक करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरु ठेवणार असा पवित्रा मच्छिमारांनी घेतला होता. मात्र, गुरुवारी दुपारनंतर मच्छिमारांनी हे आंदोलन स्थगित केले आहे. मालवण येथील दहा मच्छिमारांच्या विरोधात तसेच अन्य अज्ञात चारशे मच्छिमारांच्या विरोधात निवती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी योग्यप्रकारे तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग भाजपाच्यावतीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून भविष्यात असे प्रकार होवू नयेत म्हणून या अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मासेमारी करून उदरनिर्वाह करण्याचा हक्क जरी असला तरीही कुणीही यासाठी कायदा हातात घेवू नये.
- अतुल काळसेकर, भाजपा, जिल्हाध्यक्ष