क्षमता असती तर भाजपने मंत्रिपद दिलं असतं, ठाकरे गटाच्या नेत्याकडून नितेश राणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 03:54 PM2022-11-04T15:54:36+5:302022-11-04T15:55:08+5:30

शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले

BJP would have given him a ministerial post if he had the capacity, Criticism on Nitesh Rane from Thackeray group leader | क्षमता असती तर भाजपने मंत्रिपद दिलं असतं, ठाकरे गटाच्या नेत्याकडून नितेश राणेंवर टीका

संग्रहित फोटो

Next

कणकवली: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयाचे नेतृत्व गेली अठावीस वर्षे केले. मात्र, अनेक पदे मिळूनही जिल्हयाचा सर्वांगीण विकास ते करु शकले नाहीत. तर  जनतेसाठी आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी आमदार नितेश राणे हे मंत्र्यांना निवेदने देत सुटले आहेत. मात्र, ते कणकवली मतदारसंघात कोणतेही महत्वपूर्ण काम करु शकले नाहीत. असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी केला.

कणकवलीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, अ‍ॅड. हर्षद गावडे, वैभव मालंडकर, आदीत्य सापळे, प्रसाद अंधारी उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले, आमदार नीतेश राणेंची कार्यपध्दती भाजप नेतृत्वाला माहिती असल्याने  त्यांना मंत्री पद दिलेले नाही. फोंडाघाट, करुळ, भुईबावडा या घाट रस्त्यांची  दुरावस्था झाली आहे. ही कामे करुन घेण्याची जबाबदारी आमदार राणेंची होती. मात्र, ते कोणतेही काम करु शकलेले नाहीत. त्यांची जर क्षमता असती तर भाजपने त्यांना मंत्रीपद दिले असते. त्यांची कार्यपध्दती योग्य नसल्याने मूळ भाजप कार्यकर्ते कंटाळले आहेत.

हिंदूंच्या संदर्भात आमदार राणे आता भुमिका घेत आहेत, पण त्यांच्या भुमिका कायम बदलत असतात. पक्षाने मुळ भाजपमधील रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद दिले. राणेंचा राजकीय इतिहास सर्वांना माहिती आहे. सत्तेची अनेक पद भोगून झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस या पक्षांवर टीका करत ते पक्षाबाहेर पडले. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर उपकार केले त्यांच्याच विरोधात ते गेले, हे भाजप नेतृत्वाला माहिती आहे. ज्यावेळी शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले आहे. भाजपमध्ये आता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने नवीन प्रस्थ निर्माण झाले आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले पण पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली नाही. आपण थेट मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

जनतेच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल

आमदार वैभव नाईक यांना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी लावण्यात आली आहे. नाईक कुटूंबिय गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत. वैभव नाईकांचे नेतृत्व मोठे झाल्यानेच हे असले प्रकार भाजपकडून सुरु करण्यात आले आहेत. राणें विरुध्द टीकेचा आणि संविधानाचा संबंध काय? असा सवालही पारकर यांनी केला. आता जिल्हयाच्या पालकमंत्री पदी रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी जिल्हा विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे, जनतेच्या हितासाठी शिवसेना पुढील काळात रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात शिवसेना पक्षसंघटना अधिक मजबूत करु असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले

Web Title: BJP would have given him a ministerial post if he had the capacity, Criticism on Nitesh Rane from Thackeray group leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.