पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:20 PM2019-10-02T12:20:36+5:302019-10-02T12:36:31+5:30

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

BJP's AB form will get Nitish Rane from Kankavali without party's entry? | पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म

पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म

Next

कणकवली : गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु भाजपानं अद्यापही राणेंच्या अधिकृत प्रवेशासंदर्भात कोणतीही वाच्यता केलेली नाही. त्यातच आता कोकणातील कणकवली या मतदारसंघातून नितेश राणे भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं जवळपास निश्चित मानलं जातं आहे. मुख्यमंत्री आणि नारायण राणेंची काल रात्री एक बैठक झाली. या बैठकीतच नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे.

सध्या भाजपाकडे माजी आमदार प्रमोद जठार, अतुल रावराणे या जागेचे दावेदार होते. परंतु या दोघांचीही नावं मागे पडत नितेश राणेंना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचं जवळपास समजतं आहे. पक्ष प्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना भाजपा एबी फॉर्म देणार असल्याचीही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

तसेच नितेश राणेंनीही ट्विट करत आता फक्त काही तास बाकी असल्याचं सूचक विधान केलं आहे. ही तर वादळापूर्वीची शांतता असल्याचंही ते म्हणाले आहेत. कोकण पट्ट्यात भाजपाच्या वाट्याला एकच जागा आली असून तो परंपरागत मतदारसंघ आहे. यापूर्वी गोगटे कुटुंबाकडे आमदारकी राहिली होती. 2009 मध्ये गोगटे यांनी माघार घेतल्याने प्रमोद जठार यांना तिकीट दिले होते. तेव्हा जठार यांनी निसटता विजय मिळविला होता. 

  • शिवसेनेचा विरोध कायम

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात जाण्याच्या तारखा देत आहेत. परंतु काही झाले तरी त्यांना भाजपात प्रवेश मिळणार नाही, असा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या प्रवेशाचा दावा खोटा ठरला असल्याचं सांगत राणेंना कधीच भाजपात प्रवेश मिळणार नसल्याचं सांगितलं आहे. 

  • नारायण राणेंचा भाजपा प्रवेश अधांतरीच
    राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये होणारा प्रवेशही लटकण्याची शक्यता आहे. मी भाजपामध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात केला होता. पुढे ते म्हणाले होते की, माझा भाजप प्रवेश आणि मंत्रिपदही ठरले होते. मात्र शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी आडकाठी आणली. त्यांना माझी भीती वाटते. मात्र मी जाणार हे पक्के असल्याचेही स्पष्ट संकेत त्यावेळी राणेंनी दिले होते. परंतु भाजपाकडून अद्यापही राणेंना तारीख पे तारीख दिली जात असल्यानं त्यांच्या पक्ष प्रवेशांची अनेकांना चिंता सतावते आहे.  

Web Title: BJP's AB form will get Nitish Rane from Kankavali without party's entry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.