शिंदे गटाचा प्लॅन फसल्यास केसरकरांना भाजपचा पर्याय
By अनंत खं.जाधव | Published: August 8, 2022 05:21 PM2022-08-08T17:21:34+5:302022-08-08T17:22:46+5:30
भाजपच्या स्थानिक नेत्यांचीही भूमिका तेवढीच महत्वाची राहणार
अनंत जाधव
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे पुढचे राजकीय भविष्य सध्यातरी अवघड दिसत आहे. सततची न्यायालयीन लढाई त्यातच मूळ शिवसेनेकडून बंडखोरांवर मारण्यात आलेला गद्दारीचा शिक्का या सगळ्या पार्श्वभूमीवर केसरकरांचा जर शिंदे गटाचा प्लॅन फसला तर त्यांना भाजप शिवाय पर्याय उरणार नसल्याचे आताच दिसू लागले आहे.मात्र या सगळ्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांचीही भूमिका तेवढीच महत्वाची राहणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस विचारसरणीचा होता पण नंतर जसजसे नेते बदलले तस तशी विचारसरणी ही बदलू लागली गेल्या आठ वर्षांपासून या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व दिसत आहे.मात्र त्या तुलनेत भाजप ही काहि कमी नाही 2014 मध्ये पहिल्यांदाच भाजपने विधानसभा निवडणूक लढवून अपेक्षे पेक्षा जास्त मते घेतली तर 2019 मध्ये शिवसेना भाजप युती चा उमेदवार म्हणून दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला असतना. भाजप नेते राजन तेली यांनी युतीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत केसरकरांच्या नाकात दम आणला या निवडणूकीत केसरकर अवघ्या तेरा हजार मतांनी निवडून आले होते.
पण आता चित्र बदलले असून महाराष्ट्रातील शिवसेनेचे 40 आमदारांनी शिंदे गटात सामील होत बंडखोरी केली असून शिवसेनेला चांगलाच हादरा दिला आहे. यामध्ये सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचाही समावेश आहे.मात्र केसरकर हे जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांच्या सोबत सध्यातरी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच समर्थक गेल्याचे दिसून येत आहेत. केसरकर यांनी शिंदे गटात गेल्यानंतर आपल्या समर्थकांचा ना मेळावा घेतला ना बैठक घेतली त्यामुळे त्यांच्या सोबतचे चेहरे ही सध्या पडद्यामागे राहिले आहेत.
मात्र असे असले तरी केसरकर यांची आता भाजपशी जवळीक वाढू लागली आहे.त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी सध्या सतत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी त्यानंतर येणारा निकाल शिवसेनेचे चिन्ह कुणाला मिळणार हे अद्याप निश्चित नाही त्यातच शिवसेनेकडून मारण्यात आलेला गददारीचा शिक्का या सगळ्या पार्श्वभूमीवर केसरकर यांचे राजकारण सध्यातरी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप शिवाय त्यांना पर्याय नसून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी केसरकर यांचे चांगले सबंध असले तरी स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांशी जुळवून घेण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलवावे लागेल.