सूर्यकांत दळवी यांचा भाजप प्रवेश निश्चित?

By admin | Published: January 11, 2017 11:07 PM2017-01-11T23:07:48+5:302017-01-11T23:07:48+5:30

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट : दापोलीत शिवसेनेला खिंडार

BJP's entry to Suryakant Dalvi? | सूर्यकांत दळवी यांचा भाजप प्रवेश निश्चित?

सूर्यकांत दळवी यांचा भाजप प्रवेश निश्चित?

Next



दापोली : दापोलीच्या राजकारणात गेली २५ वर्षे निर्विवाद सत्ता गाजविणारे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात १९९० साली दळवी यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तेव्हापासून सलग २५ वर्षे आमदार म्हणून ते निवडून आले. रत्नागिरीतून सलग पाचवेळा निवडून जाणारे एकमेव आमदार दळवी यांचा षट्कार २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हुकला. आपला पराभव विरोधकांकडून नाही, तर स्वकीयांनीच गद्दारी केल्यामुळे झाला असल्याचा उल्लेख दळवी यांनी वारंवार केला होता.
सहाव्यांदा निवडून आले असते तर दळवी यांना मंत्रिपद मिळाले असते. यामुळे हा पराभव त्यांच्या अधिकच जिव्हारी लागला. विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळण्याची आशा त्यांना होती, परंतु शिवसेनेकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. त्यामुळे गेले अनेक दिवस दळवी पक्षावर नाराज होते.
निवडणुकीतील पराभवाबाबत त्यांनी थेट पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनाच जबाबदार धरले होते. लोकसभा निवडणुकीतही रामदास कदम यांनी पक्षाच्या विरोधात काम केले होते. मग ते निष्ठावंत कसे, असा सवालसुद्धा त्यांनी जाहीरपणे केला होता.
रामदास कदम समर्थकांवरही त्यांनी थेट हल्लाबोल केला होता. दळवी यांना डावलून नगरपंचायत निवडणुकीचे सर्व अधिकार योगेश कदम यांच्याकडे सोपविण्यात आले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे सूत्र पुन्हा योगेश कदम यांच्याकडे सोपविण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याने दळवी अनेक दिवस अस्वस्थ होते.
रामदास कदम यांच्यावर अलीकडेही दळवी यांनी सडकून टीका केली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृ त उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्या गद्दारांची संघटनेत पदावर वर्णी लागत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दळवी यांनी दिला होता. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांची पदावर वर्णी लागणे थांबले होते.
या एकूणच वादाच्या पार्श्वभूमीवर दळवी यांनी आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजपकडून त्यांचे लाल दिव्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.आजच्या या भेटीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's entry to Suryakant Dalvi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.