छोटे पक्ष संपविण्याचे भाजपचे कारस्थान
By admin | Published: January 18, 2015 11:32 PM2015-01-18T23:32:36+5:302015-01-19T00:22:34+5:30
कपिल पाटील : सावंतवाडीतील अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनातील परिसंवादात टीका
सावंतवाडी : लोकशाहीत जाती व्यवस्थेमुळे राजकारणाची रूंदी संकुचित होत चालली असून, नव्याने सत्तेवर आलेला पक्ष धनादांडग्यांना हाताशी धरून छोटे छोटे पक्ष संपविण्याचे कारस्थान करीत आहे, अशी टीका शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली. तसेच सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेतील नेतेही आता संकुचित झाले आहेत, असेही यावेळी आमदार पाटील म्हणाले.
सहाव्या राज्यव्यापी कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात राजकारण व समाजकारणाच्या कक्षा संकुचित होत चालल्या आहेत का, या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे अध्यक्ष किशोर बेडकिहाळ होते. तर प्रमुख वक्ते प्राचार्य आनंद मेणसे, वैशाली पाटील आदी यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, भाजप म्हणून पक्ष सत्तेवर आला असे म्हणत असतील तरी भाजप सत्तेवर आले नाही तर नरेंद्र मोदी सत्तेवर आले आहेत. ही सत्तेची सूत्रे अल्पसंख्याकांचा आवाज मोडून काढत मिळवली आहे. या पक्षाच्या अजेंड्यावर केव्हाच सोशितांचे प्रश्न नव्हते, असे सांगत आमदार पाटील यांनी पॅरिसमधील ‘शार्लाे’ प्रकरणाचा संदर्भ देत जरी कोण हा हल्ला म्हणत असले तरी माझ्या मते हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. पण अभिव्यक्ती दिली म्हणजे आपण कितीवेळा दुसऱ्याला शिव्या देणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.किशोर बेडकिहाळ यांनी सांगितले की, स्पर्धात्मक दृष्टीकोनातून पाहताना जागतिकीकरणात अर्थकारण व राजकारण यांचा संबंध तुटत चालला आहे. आजच्या निवडणुका जाती धर्माच्या लढवल्या जात आहेत.पंचवीस वर्षांपूर्वी एखादा नेता कार्यकर्ता जर पक्ष सोडत असेल तर वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. पण आता कार्यकर्ते दररोज पक्ष बदलू लागले आहेत. त्यामुळे पक्षास राजकारणाला किंमत उरली नाही. सर्वांनीच याचा विचार करण्याची गरज आहे. आज कोणत्या पक्षाकडे धोरण शिल्लक राहिले नाही, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
आरक्षणाच्या नावावर जातीजातीत भांडणे लावण्याचे काम सुरू असून, स्वातंत्र्याच्या ६७ व्या वर्षानंतरही आरक्षण मागणे कितपत योग्य आहे, असा सवाल करीत आरक्षणाने आपले मागसलेपण सिद्ध होत असल्याचे यावेळी बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.वैशाली पाटील म्हणाल्या, मी अनेक आंदोलने केली. लोकशाहीत लोकांना काय महत्त्व असते ते रायगडमध्ये रिलायन्सचा सेझ रद्द करून दाखवून दिले आहे. मी आंदोलनात उतरले की, मला बाहेरच्या गावातून आली म्हणून हिणवत असतात, पण प्रकल्प करण्यासाठी येणारे कोठून येतात, असा सवाल करीत विकासाचे मॉडेलच राहिलेले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
जागतिकीकरणात राजकारणी लोकांमध्ये सामान्य माणूस भरडत चालला आहे. उद्योजक पैशाच्या जोरावर लोकांना विकत घेण्याची भाषा करू पाहत आहेत. पण सामान्य शेतकरी लढतो, आंदोलने करतो पण मागे फिरत नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत पण ते अश्रू आंदोलनात मागे ठेवतो आणि खाद्याला खांदा लावून काम करतो. जैतापूर प्रकल्प विनाशकारी प्रकल्प असूून तो जगाला नको पण भारताला हवा आहे. अणुऊर्जेच्या विरोधात जग आहे. पण भारत सोबत आहे. येथील राजकारणी लोकांना प्रकल्पग्रस्त मरण पावला तरी चालेल पण कंपन्या जगल्या पाहिजेत, असे धोरण घेऊन काम सुरू आहे. हे थांबणे गरजेचे आहे, असे मत यावेळी वैशाली पाटील यांनी मांडले.
प्राचार्य आनंद मेणसे यांनी जाती व्यवस्थेबाबत माहिती दिली. मी ज्या ठिकाणी वाढलो त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीतून जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात प्रत्येकवेळी यशस्वी झालो. अनेक संस्था तयार केल्या त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रवेश देण्यात आला.
आजही ती संस्था काम करीत आहे, असे सांगत मेणसे यांनी जातीय सलोखा कायम टिकला पाहिजे. समाजाची अस्मिता भिन्न होत चालली आहे. ती कुठेतरी थांबावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. या परिसंवादाचे प्रास्ताविक सुमेधा नाईक यांनी केले तर आभार गोविंद काजरेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
दबलेला आवाज उग्र रुप धारण करेल..!
देशात मध्यमवर्ग हा २६ कोटी असून सरकारी आकडेवारीनुसार गरीब हा २१ कोटी आहे. सध्यस्थितीत राजकारणाची रूंदी संकुचित होत चालली असून, सरकार धनदांडग्यांना हाताशी धरून छोटे छोटे पक्ष संपवू पाहत आहे. पण हे त्यांना शक्य नाही. दबलेला आवाज हा आज जरी शांत असेल पण कालांतराने तो उग्ररूप धारण करेल, असा इशारा आमदार कपिल पाटील यांनी यावेळी दिला आहे.
घाटी व कोकणी या शब्दांवरून संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर यांनी अनेक अर्थ स्पष्ट केले. कोकण म्हणजे भारत राहिले असून घाट हे आता युरोप बनत चालल्याचे त्यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
यावेळी जयप्रकाश सावंत यांनी संमेलनाचे तोंडभरुन कौतुक केले. संमेलनाचे मुख्य आयोजक कॉ. गोविंद पानसरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना अण्णांचे अनेक पैलू उलगडून सर्वांना चकित केले. तसेच त्यांनी आजच्या राजकीय व्यवस्थेवरही भाष्य केले. या संमेलनात अनेक ठराव मांडण्यात आले. यात सावंतवाडीत अण्णा भाऊ साठेंचे स्मारक करण्यात यावे तसेच नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लवकरात लवकर व्हावा, अशा मागण्या यावेळी ठरावाद्वारे करण्यात आल्या.
सावंतवाडीतील साहित्य संमेलन आयोजकांच्यावतीने स्वागताध्यक्ष बबन साळगावकर यांचा संमेलनाध्यक्ष सतिश काळसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.