दोडामार्गमध्ये भाजपाचे रास्तारोको आंदोलन, बांधकाम उपअभियंता धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 03:08 PM2020-11-05T15:08:42+5:302020-11-05T15:10:34+5:30

dodamarg, highway, pwd, sindhudurg, bjp दोडामार्ग तालुक्यातील राज्यमार्ग दुरुस्तीसंदर्भात करण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या आंदोलनांंना बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली. त्यामुळे, आघाडी सरकार व शासनाविरोधात संतप्त झालेल्या दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सासोली येथे मोठ्या संख्येने एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले.

BJP's Rastaroko agitation in Dodamarg, construction deputy engineer on edge | दोडामार्गमध्ये भाजपाचे रास्तारोको आंदोलन, बांधकाम उपअभियंता धारेवर

सासोली येथे भाजपच्यावतीने रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देदोडामार्गमध्ये भाजपाचे रास्तारोको आंदोलन, बांधकाम उपअभियंता धारेवर ३० नोव्हेंबरपर्यंत रस्ता सुस्थितीत करण्याच्या लेखी पत्रानंतर स्थगित

दोडामार्ग : तालुक्यातील राज्यमार्ग दुरुस्तीसंदर्भात करण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या आंदोलनांंना बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली. त्यामुळे, आघाडी सरकार व शासनाविरोधात संतप्त झालेल्या दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सासोली येथे मोठ्या संख्येने एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले.

यावेळी बांधकाम उपअभियंता चव्हाण यांना धारेवर धरले. ठेकेदाराशी असलेल्या साटेलोट्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तुम्ही जनतेचा जीव धोक्यात घालत आहात. तुमची मुजोरगिरी खपवून घेणार नाही अशा शब्दांत कानउघाडणी केली. त्यावेळी ३० नोव्हेंबरपर्यंत रस्ते व्यवस्थित करण्यात येतील, असे लेखी पत्र उपअभियंत्यांनी दिले. दिलेल्या तारीखपर्यंत हे आंदोलन स्थगित करीत असून रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही तर खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन छेडू, असा ईशारा भाजपच्यावतीने देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.

या राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. चाळण झालेल्या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनचालक त्रस्त होतात. सर्वसामान्यांचा आवाज राज्य शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाने बुधवारी सासोली येथे रास्तारोको आंदोलन केले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व भाजप उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, संतोष नानचे, रमेश दळवी, विलास सावंत, सूर्यकांत गवस, अजय परब आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, दोडामार्ग प्रभारी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, राखीव नियंत्रण दल मिळून सुमारे ५० ते ६० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गोव्याच्या रस्त्याने येतात; लाज वाटली पाहिजे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री, आमदार दोडामार्ग तालुक्यात येताना बांदामार्गे न येता गोव्यातून येतात. मात्र, सामान्य जनता कसा जीवघेणा प्रवास करते हे आजमावत एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याची तरी लाज बाळगा. हे अपयशी सरकार जनतेच्या हिताचे नाही. म्हणून तिघाजणांनी मुंडण केले. कोविडच्या नावाखाली निधी गिळंकृत करून पुढच्या मतदानाची तयारी करीत आहेत, असा टोला एकनाथ नाडकर्णी यांनी लगावला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवरून फिरणे

रस्त्यासंदर्भात बुधवारी भाजपचे आंदोलन आहे हे आठ दिवसांपूर्वी जाहीर झाले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नेमकी आंदोलनादिवशी ठेवली. हे पूर्वनियोजित अधिकाऱ्यांंचे घोटाळे दडपण्यासाठी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी चारचाकी गाडीत बसून न फिरता दुचाकीने दोडामार्ग तालुक्याचा प्रवास करावा. तेव्हाच सामान्यांचे दुखणे समजेल, असे म्हापसेकर म्हणाले.

भाजप अंतर्गत वाद अद्याप कायम

तालुक्यातील रस्ते सुव्यवस्थित करण्यासंदर्भात भाजपच्यावतीने बुधवारी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आले. मात्र, या आंदोलनात भाजपचा दुसरा गट सहभागी झाला नव्हता. यावेळी आंदोलनस्थळी माजी पदाधिकाऱ्यांंनी नाराजी व्यक्त केली. परंतु एकंदरीत या प्रकारावरून तिढा सुटला नसून अजूनही आहे हे उघड झाले. महिन्याभरापूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांमधील तिढा सुटल्याचे जाहीत केले होते. जो गट या आंदोलनात सहभागी झाला नाही. त्या गटाने आपल्याला या आंदोलनापासून अलिप्त ठेवण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

Web Title: BJP's Rastaroko agitation in Dodamarg, construction deputy engineer on edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.