बांद्याचा गड भाजपने राखला, अक्रम खान विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:08 PM2019-12-11T13:08:52+5:302019-12-11T13:10:28+5:30
बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली असून, आपला गड कायम राखण्यात यश मिळविले आहे.
सावंतवाडी : बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली असून, आपला गड कायम राखण्यात यश मिळविले आहे. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या अक्रम खान यांनी शिवसेनेच्या मंकरद तोरस्कर यांचा तब्बल ८१३ मतांनी पराभव करत आपले वर्चस्व राखले आहे. यात अक्रम खान यांना २,१६१ मकरंद तोरस्कर १,३४८ तर अपक्ष साईप्रसाद कल्याणकर यांना ११५ मते पडली आहेत.
बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी आपल्या व्यक्तीगत कारणासाठी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बांदा ग्रामपंचायतीची सरपंचपदाची पोटनिवडणूक लागणार हे निश्चित झाले होते. या निवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच विद्यमान उपसरपंच अक्रम खान इच्छुक होते. भाजपनेही त्यांनाच उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेकडून ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर यांनी निवडणूक लढविली होती. अपक्ष म्हणून साईप्रसाद कल्याणकर यांनीही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता.
सावंतवाडीतही विजयश्री खेचून आणणार : सारंग
आम्ही बांद्याप्रमाणे सावंतवाडीतही विजय खेचून आणणार असल्याचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी सांगितले. हा स्थानिक ग्रामस्थ तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विजय आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार मेहनत घेऊन काम केले. गेला महिनाभर घरोघरी जाऊन प्रचार केला. हा त्यांचा विजय आहे, असे मत सारंग यांनी व्यक्त केले. तसेच भाजपने मुस्लिम चेहरा देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्याचा निश्चित असा फायदा आम्हाला जिल्ह्यात होईल. बांदा येथे विजयश्री खेचून आणली. आता हा विजयाचा रथ संपूर्ण राज्यात जाईल, असेही यावेळी सारंग यांनी सांगितले. तसेच त्यांनी अक्रम खान यांचे अभिनंदन केले.
सर्वांना बरोबर घेऊन काम करणार : अक्रम खान
बांद्यातील नागरिकांनी जो कौल दिला तो मान्य असून, आता माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे चांगल्या पध्दतीने काम करून बांदा शहरात विकासाची गंगा घेऊन यायची आहे. यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे विजयी उमेदवार अक्रम खान यांनी सांगितले.