वादळाचा २0 घरांना तडाखा
By admin | Published: March 29, 2015 10:21 PM2015-03-29T22:21:57+5:302015-03-30T00:24:07+5:30
शिरशिंगे गाव अंधारातच : नुकसानीचा आकडा दहा लाखांवर
सावंतवाडी : शिरशिंगे येथील गोठवेवाडी, परबवाडी परिसरातील २० कुटुंबाना चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये तब्बल १० लाखांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून महसूल विभागाचे अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामेच करीत होते. घराच्या नुकसानाबरोबरच केळी, अन्य बागायती चक्रीवादळात भुईसपाट झाल्या आहेत.
शिरशिंगेसह कलंबिस्त, वेर्ले, सांगेली आदी ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस कोसळत होता. यातच शिरशिंगे येथे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळाचा तडाखा एवढा प्रचंड होता की, अवघ्या एका तासात यामध्ये वीस घरांचे होत्याचे नव्हते झाले. तर पूर्ण गाव शनिवारी अंधारात होता. रविवारीही वीजवाहिन्या जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. काही घरात वीज आली नसल्याने त्यांचा रविवारही अंधारात गेला आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाचा फटका वीस घरांना बसला असून यात अनेक घराचे पत्रे उडून गेले आहेत. यामध्ये मानाजी घावरे, सुप्रिया घावरे, रावजी घावरे, दशरथ घावरे, संतोष पेडणेकर, भगवान परब, दशरथ परब, सदाशिव घावरे आदींचा समावेश आहे.
यामध्ये प्रत्येकाच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत तर काहींच्या घरावर झाडे कोसळली असल्याने घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावर वीज वाहिन्याही मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहेत. रविवारी तलाठी सचिन गोरे यांनी शिरशिंगे येथे जात पंचनामे केले. यावेळी अनेकांनी आपली कैफियत अधिकाऱ्यांकडे मांडली आहे.
काहींच्या घरावर झाडे कोसळल्याने रात्र दुसऱ्याच्या घरात काढावी लागली असून पावसाचे पाणी प्रत्येकाच्या घरात शिरले
आहे. (प्रतिनिधी)
बागायती भुईसपाट; शेतकऱ्यांनी अश्रू ढाळले
या चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेकांच्या केळी बागायती भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.