अंध भावंडांची कलासाधना -जागतिक अंध सहाय्यता दिन
By admin | Published: October 14, 2015 11:33 PM2015-10-14T23:33:43+5:302015-10-15T00:38:48+5:30
जीवन हे अक्रोडाचे झाड : देवलाटकर
अमोल पवार --आबलोली--गुहागर तालुक्यातील काजुर्ली गावातील आनंद नथुराम मेस्त्री आणि विजया नथुराम मेस्त्री या दोन्ही भावंडांनी आपल्यातील अंधत्वावर मात करत आपली कलेची साधना अविरतपणे चालू ठेवली आहे. त्यांच्या या कलासाधनेचे अप्रूप अनेकांना वाटते.
आनंद मेस्त्री हे अंध असूनही मोठ्या कौशल्याने गणपती कारखाना चालवतात. त्यासाठी त्यांना आपल्या कुटुंबियांची मदत मिळते. उत्तम हार्मोनियमवादक म्हणून ते परिसरात परिचित आहेत. विजया मेस्त्री या छोटे गोळ्या-बिस्किटांचे दुकान चालवतात. अगदी सफाईदारपणे वस्तू देणे तसेच पैसे घेणे, परत देणे या कृती त्या करतात. त्यासुद्धा उत्तम पार्श्वगायिका म्हणून परिचित आहेत. स्थानिक आणि परिसरातील हौशी कलाकारांनी सादर केलेल्या नाटकांसाठी त्या पार्श्वगायन करतात. स्वत: एकपाठी असून, त्या दुसऱ्यांकडून एकदा वाचून घेतात. त्यानंतर स्वत: पाठांतर करुन गाणे म्हणतात. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांसाठी पार्श्वगायन केले आहेत. गरीब व्यक्तींसाठी शक्य ती मदत करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.
आबलोली : अंध असूनही डोळसपणे शालेय क्रमिक पुस्तकांवर व्याख्याने देणारे आणि आपल्या प्राप्त अनुभवांना साहित्यरुपाने वाचकांसमोर ठेवणारे चंद्रकांत सिताराम देवलाटकर यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर आजपर्यंत सुमारे ५००० व्याख्यानांचे कार्यक्रम तसेच चार वार्षिकांक प्रसिद्ध केले आहेत.
त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत बाहेरुन झाले. मात्र, त्याचवर्षी सर्पदंशाने त्यांची दृष्टी गेली आणि तेव्हापासून आजतागायत ते दुसऱ्यांकडून वाचून, लिहून घेत आहेत. अनेक नवीन कवितांना चाली लावणे, पद्यातील अलंकारिकता, गद्याचे वेगळेपण, लेखन कौशल्ये, भाषण कौशल्ये इत्यादी विषयांवर देवलाटकर हिरीरीने बोलतात. रत्नागिरी जिल्ह््यातील अनेक शाळांमधून त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. केवळ व्याख्यानांवर न थांबता देवलाटकर यांनी चित्रांगी, रत्नपारखी, स्वयंसिद्ध, मानी मराठा हे चार विशेषांक साहित्य सिद्धी प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले आहेत. आपल्या साहित्य लेखनासाठी मुलगी चारुलता, मुलगा चिंतामणी मदत करत असल्याचे देवलाटकर यांनी सांगितले.
आपण एकपाठी असून, एखाद्याकडून वाचून घेतलेले साहित्य आपणास लक्षात राहते, असे सांगितले.
पत्नीच्या निधनानंतर आपण खचलो. मात्र, तिच्याच आठवणीने आपण लेखन करतो. ॐ निसिनंदन चंद्रकांत, स्वरचंद्रम, चित्रकांत, चिद्रानंदीचंद्र आदी नावाने त्यांनी संगीतकार, नाटककार, विडंबनकार म्हणून लेखन केले आहे.
देवलाटकर म्हणतात, आपले जीवन म्हणजे अक्रोडाचे झाड आहे. ज्याप्रमाणे अक्रोडाला १०० वर्षानंतर फळं येतात म्हणून झाड लावायचं सोडायचं का? हा त्यांचा प्रतिप्रश्न समोरच्या व्यक्तीला अंतर्मुख करतो. केवळ दिसत नाही म्हणून अंध असलेल्या देवलाटकरांचं हे म्हणणं डोळस माणसालाही नवी दृष्टी देऊन जातं. (वार्ताहर)