मळेवाडला वादळाचा जोरदार तडाखा
By admin | Published: June 17, 2014 01:09 AM2014-06-17T01:09:05+5:302014-06-17T01:15:47+5:30
सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून मळेवाड परिसरात सोमवारी सांयकाळी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह ढगाचा कडकडाटामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले
मळेवाड : सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून मळेवाड परिसरात सोमवारी सांयकाळी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह ढगाचा कडकडाटामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे ढगांच्या कडकडाटात अनेक जणांचे टीव्ही तसेच विद्युत प्रवाह जळून खाक झाले आहेत. यात मनुष्यहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. याबाबतची नोंद महसूल दप्तरी उशिरापर्यंत नव्हती. त्यामुळे पंचनामे करण्यात आले नव्हते.
याबाबत माहिती अशी की, सावंतवाडी तालुक्यात सोमवार सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता. हा पाऊस थांबून कोसळत असल्याने अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच तालुक्यातील काही गावात पावसाबरोबर ढगांचा कडकडाट झाल्याने भर पावसात ग्रामस्थांना अंधारात रहावे लागत आहे.
मळेवाडमध्ये तर सांयकाळी उशिरा पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अचानक जोरदार पाऊस तसेच विजेच्या कडकडाटामुळे मळेवाड गावातील विद्युत प्रवाह पूर्णपणे खंडित झाला आहे. काही वाड्यांवर अचानक पडणाऱ्या विजेच्या लोळामुळे टीव्ही तसेच वीज प्रवाह करणारे विद्युत पोल जळून खाक झाले आहेत. घरातील मीटरमध्ये अचानक आग लागून विद्युत पुरवठा खंडित होत होता. या घडलेल्या प्रकाराने ग्रामस्थही भयभीत झाले आहेत.
या हानीत मळेवाड- मुरकरवाडी व आरोंदा रोड परिसरातील ग्रामस्थांचा समावेश असून प्रत्यक्ष पाहणीप्रमाणे मदन शंकर मुरकर, बाबा मुरकर, सीताराम रेडकर आदींचे दूरदर्शन संच जळून खाक झाले आहेत. तर विजेच्या लोळामुळे बऱ्याच ग्रामस्थांचे मीटर ही जळून खाक झाले आहेत.
या सर्वाची पंचनामा यादी करण्याचे काम सुरू असून याची कल्पना महसूल विभागाला नसल्याने रात्री उशिरापर्यंत एकही अधिकारी किंवा गाव तलाठी गावात पोचला नव्हता. सावंतवाडीतील महसूल विभागाशी संपर्क साधला असता, नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांनी कोणत्याही प्रकारची आपत्कालीन नोंद नसल्याचे सांगितले. त्यामुळे महसूल विभाग वरातीमागून घोडे नाचविण्याची शक्यता असून अनेक महत्वाचे अधिकारी गावातच राहत नसल्याचे स्पष्ट होत आहेत.
हानी गावात तलाठी शहरात
तालुक्यातील कोणत्याही गावात हानी झाली, तर तलाठी यांचे सहाय्यक आपल्या साहेबांना कल्पना देतात. त्यानंतर साहेब गावात पोचतात. ती पण महत्वाची घटना असेल, तर साहेब येतात आणि नसेल तर कर्मचाऱ्याला बघून घ्यायला सांगतात. तसाच प्रत्यय मळेवाडमध्ये आला असून या घटनेची कल्पना उशिरापर्यंत महसूल विभागालाच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)