बांद्यात खासगी माहिती घेणाºयांना रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:57 PM2017-10-08T23:57:12+5:302017-10-08T23:57:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : जनधन योजनेचा फायदा घेतला का? घरात तुमच्या किती माणसे आहेत? आधारकार्ड, रेशनकार्ड आहे का? पॅनकार्ड आहे का? अशी खासगी माहिती विचारत घरातील लोकांची छायाचित्रे काढणाºया पाचजणांना स्थानिकांनी मज्जाव करीत धारेवर धरले. वातावरण तंग होताच बांदा पोलिसांनी वेळीच धाव घेत या पाचजणांना ताब्यात घेतले.
बांद्यात शनिवार (दि. ७ आॅक्टोबर)पासून एका खासगी कंपनीकडून घरातील लोकांचा सर्व्हे केला जात होता. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तीन युवक मोर्येवाडा परिसरात लोकांकडून माहिती घेत होते. त्यांनी काही महिलांची छायाचित्रे काढली.
दरम्यान, हे तीन युवक येथील एका दुकानवजा घरात माहिती घेण्यास गेले असता तेथील युवकांनी त्यांना रोखले. तुम्ही कसली माहिती घेता? तुमच्याकडे काय पुरावा आहे? आमची माहिती घेऊन काय करणार? असे सवाल करीत या तिघांना त्यांनी धारेवर धरले. एवढ्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमला. लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना या तिघांची भंबेरी उडाली. त्यानंतर त्यांनी आपले वरिष्ठ आले असल्याचे सांगितले. त्यांनाही त्याठिकाणी बोलाविण्यात आले. त्यालाही लोकांनी चांगलेच फैलावर घेतले. दिल्ली येथील खासगी कंपनीतर्फे सर्व्हे करण्यात आल्याचे त्याने सांगताच लोक संतापले.
दरम्यान, याबाबत तुम्ही स्थानिक पोलीस स्थानकात माहिती देऊन परवानगी घेतली का? असे विचारता त्यांनी होय म्हणून सांगितले. मात्र, पोलीस स्थानकात फोन लावला असता कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लोक आणखी संतप्त झाले.
वातावरण तंग होताच बांदा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. बांदा पोलीस मनीष शिंदे, विजय जाधव, जनार्दन रेवंडकर, प्रसाद कदम यांनी घटनास्थळी येत या पाचजणांना बांदा पोलीस स्थानकात आणले. याठिकाणी त्यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. जिल्ह्यात सर्व्हे करण्यासाठी प्रथम जिल्हाधिकारी, स्थानिक पोलीस आणि सरपंच अथवा ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायची असते. मात्र, यापैकी कोणाचीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती. बांदा सरपंच बाळा आकेरकर यांनीही त्यांना दुपारी तुम्ही सर्वेक्षण करू नका, असे सांगितले होते. त्यामुळे ते आणखी पेचात सापडले.