भोगवे समुद्र किनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’; केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 01:42 PM2019-12-03T13:42:43+5:302019-12-03T13:44:16+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र दिले आहे.

'Blue Flag Certificate' at Bogwe beach; Announced by the Union Ministry of Environment | भोगवे समुद्र किनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’; केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जाहीर

भोगवे समुद्र किनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’; केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जाहीर

googlenewsNext

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे  महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. एकूण ४ उत्कृष्ट मानकांच्या ३३ घटकांआधारे ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट १३ समुद्र किनाऱ्याची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

पर्यावरण शिक्षण आणि माहिती, आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी सोमवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  ही  माहिती दिली.

३३ घटकांव्दारे निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढ-या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील  निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते. याच समुद्र किनाऱ्याची ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ ने एकूण ४ उत्कृष्ट मानकांच्या  ३३  घटकांआधारे ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी निवड केली.

भोगवे किनाऱ्यावर जाणारा मार्ग

भोगवे समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी परूळे बाजार येथून ६ किलोमीटर प्रवास करून जाता येते. प्रस्तावित चिपी विमानतळपासून भोगवे किनारा हवाई अंतर एक ते दीड किलोमीटर आहे. केंद्र शासनाच्या निर्मला सागरी तट अभियानाअंतर्गत भोगवे किनाऱ्यावर बैठक व्यवस्था, स्वच्छता गृह, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मालवण येथील देवबाग सागरी किनाऱ्याचा नस्त हा शेवटचा भाग जेथे संपतो तेथून भोगवे किनारा सुरू होतो. देवबाग येथून समुद्रातून जाण्यासाठी हा किनारा १0 मिनीटांच्या अंतरावर आहे.

निवती किल्ला ठरतोय आकर्षण

भोगवे समुद्र किनाऱ्यावर निवती किल्ला वसलेला आहे. निवती किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस भोगवेचा जवळपास चार किलोमीटर लांब स्वच्छ सागर किनारा पसरलेला आपल्याला दिसतो. या किनाºयावर पर्यटकांची मोठी वर्दळ अद्याप नाही. त्यामुळे येथे समुद्राच्या लाटांव्यतिरिक्त निरव शांतता पहायला मिळते. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचे या ठिकाणी आकर्षण पाहायला मिळत आहे.

Web Title: 'Blue Flag Certificate' at Bogwe beach; Announced by the Union Ministry of Environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.