सिंधुदुर्गात उद्यापासून जलपर्यटन बंद, पर्यटकांना बसणार बंदीचा फटका
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 25, 2024 02:09 PM2024-05-25T14:09:22+5:302024-05-25T14:18:11+5:30
प्रवासी वाहतूक असोसिएशनने काही दिवसांची मागितली मुदतवाढ
संदीप बोडवे
मालवण : पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश बंदर आणि पर्यटन विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी २६ मेपासून सागरी जलपर्यटन आणि सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंतीसाठी मालवण गाठणाऱ्या पर्यटकांचा या बंदीमुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे. परंतु पर्यटकांची संभाव्य नाराजी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाकडे काही दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.
मे महिन्यातील पर्यटन हंगाम १५ मेनंतरच मोठ्या प्रमाणात सुरू होतो. तरी मासेमारी हंगामाप्रमाणे आपणास ३१ मेपर्यंतचा हंगाम कायम करावा. याअगोदर हवामानाचा अंदाज घेऊन बंदर विभागाने काही दिवसांसाठी टप्याटप्याने मुदतवाढ दिलेली आहे, असे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी, वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे म्हणणे आहे. २०१६ मधील मुदतवाढ आदेशाची प्रतसुद्धा संघटनेने आपल्या निवेदनासोबत बंदर विभागाला सादर केली आहे.
आता शासनाकडून या मागणीला प्रतिसाद मिळतो का, याकडे पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे. गतवर्षी पावसाळी हंगामामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलपर्यटन बंद करण्यात आले. आता यावर्षीसुद्धा बंदर विभाग, पर्यटन विभाग आणि पर्यायाने शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहते, की जलपर्यटन व्यावसायिकांना टप्प्याटप्याने काही दिवसांसाठी मुदतवाढ देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पर्यटकांना बसणाक बंदीचा फटका
गतवर्षी २६ मेपासून हजारो पर्यटकांना जेटीवरूनच किल्ला दर्शन करावे लागले होते. मालवणात आलेले पर्यटक रॉक गार्डन आणि तालुक्यातील समुद्र किनारे फिरून माघारी परतत होते. ३१ मेपर्यंत मोठ्या संख्येने पर्यटक मालवणात येत होते. मात्र, २६ मेपासूनच्या जलपर्यटन बंदीचा फटका त्यांना बसला होता. जलपर्यटनासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सागरी जलपर्यटनाबरोबर समुद्रात मालवाहतूक करणारी जहाजे तसेच नद्या किंवा तलावातील जलपर्यटनालासुद्धा ही बंदी लागू होणार आहे.