देवबागमध्ये बोट बुडाली,
By Admin | Published: July 15, 2016 10:29 PM2016-07-15T22:29:19+5:302016-07-15T22:35:53+5:30
एक बेपत्ता
मालवण : समुद्रात अजस्त्र लाटांचा रुद्र्रावतार कायम असताना देवबाग ख्रिश्चनवाडी येथील मासेमारीस गेलेली बोट लाटांच्या तडाख्यात बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीत असलेल्या तीन मच्छिमारांपैकी पास्कू बेजविन बिद्र (वय ३५) व मनवेल फ्रान्सिस फर्नांडिस (३९) या दोघा मच्छिमारांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे, तर बोयाच्या मदतीने सहकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे कामीन ऊर्फ पार्था सतान लुद्रिक (४०, रा. देवबाग ख्रिश्चनवाडी) हे समुद्रात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास देवबाग किनारी घडली.
दरम्यान, मालवण तहसीलदार वनिता पाटील यांना घटनेची माहिती मिळताच महसूल यंत्रणा, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, मत्स्य विभाग तसेच पोलिस प्रशासन यांना माहिती देण्यात आली. ताम्हणकर यांनी तत्काळ दांडी येथील मासेमारी बोट उपलब्ध करून देत स्थानिकांच्या मदतीने कामीन यांचा समुद्रात शोध घेण्यात आला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. (प्रतिनिधी)