मृतदेह निघाले, ढिगारे शिल्लक
By admin | Published: June 25, 2015 11:03 PM2015-06-25T23:03:31+5:302015-06-25T23:03:31+5:30
आता आठवणीचे ढिगारे....
शिवाजी गोरे दापोली
दाभोळ टेमकरवाडीतील दुर्घटना ग्रामस्थ अजूनही विसरले नसून ती काळरात्र अजूनही त्यांच्या अंत:करणात खोलवर रुजली असून नुसती आठवण काढली तरीही आमच्या जीवाचा थरकाप होतो. दुर्दैवी घटना घडून गेली. या घटनेत या वाडीने बरंच काही गमावलं आहे. या वाडीची झालेली जिवीतहानी पुन्हा भरुन निघणार नाही. चार रात्री या दुर्घटनेला होऊन गेल्या मात्र झोप काही येत नाही अजूनही ही वाडी रात्रीचा दिवस करुन जीवन जगत असून टेमकरवाडीवरचे भितीचे सावट दूर झालेले नाही.
दाभोळ टेमकरवाडीची भौगोलीक रचना ही एका बाजूला उभा डोंगर तर पायथ्याशी अथांग दाभोळखाडी या दोन्हीच्या मध्यभागी दाभोळ गाव वसले आहे. या गावाची भौगोलिक रचना अतिशय सुंदर आहे. प्राचीन काळी वसलेल्या या गावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. परंतु अलिकडे या गावावर निसर्गाचा कोप होऊ लागला आहे. २०१० मध्ये डोंगराची दरड कोसळून दोन घरांचे नुकसान, त्या पाठोपाठ नुकतीच घडलेली दुर्घटना यामुळे दाभोळ गावावर दु:खाचे सावट पसरले आहे.
दाभोळ टेमकरवाडीत ३० कुटुंबाचे अधिवास आहे. प्रत्येकाच्या घरासमोर नारळ, सुपारी, आंबा, काजू, सागची झाडे आहेत. या वाडीचे रक्षण करण्यासाठी डोंगरात वाडीच्या डोक्यावर हनुमानाचे मंदीर आहे. महाडिक कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू लोकांच्या जिव्हारी लागला आहे.
निसर्ग कोपला व डोंगर कोसळून दरडीखाली तीन घरे गाडली गेली. यामध्ये पाचजणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. या दुर्घटनेतून सुदैवाने काही कुटुंबे बचावली. काळाच्या दाढेतून त्यांची सुटका झाली. एका घराला आंब्याच्या झाडानेच वाचविले. डोंगराची कोसळलेली माती आंब्याच्या झाडाने थोपवून धरल्याने त्या घरातील पाच जणांचा जीव वाचला.
आता आठवणीचे ढिगारे....
टेमकरवाडीतील महाडिक कुटुुंबियांच्या घरासमोरील निसर्गरम्य वातावरण पाहून मन प्रसन्न होत होते. परंतु रविवारी मध्यरात्री २.३० वाजता डोंगर कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे नंदनवन असणारे घर अंगणाच्या जागी केवळ आठवणीचे ढिगारेच शिल्लक राहिले आहेत. महाडिक यांच्या घरकाडे नजर टाकल्यावर त्या ठिकाणी भितीचे सावट व स्मशान शांतता दिसून येत आहे. कधी काळी गजबजलेल्या निसर्गरम्य परिसर आता स्मशानातील भेसूर शांततेसारखा वाटू लागला आहे. पुन्हा डोंगर खचण्याची भीती अजून कायम आहे.