अखेर तेरा दिवसांनी मृतदेह अन्यत्र दफन

By Admin | Published: April 24, 2017 11:34 PM2017-04-24T23:34:47+5:302017-04-24T23:34:47+5:30

वादावर पडदा : धर्मगुरूंच्या पत्रानंतर पालिकेची कार्यवाही

The body of the deceased is buried somewhere else | अखेर तेरा दिवसांनी मृतदेह अन्यत्र दफन

अखेर तेरा दिवसांनी मृतदेह अन्यत्र दफन

googlenewsNext



सावंतवाडी : नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिलेला आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा तसेच स्वराज्य संघटना, भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा उद्भवणारा प्रश्न लक्षात घेऊन अखेर ख्रिश्चन धर्मगुरूंनी नगरपालिकेला दिलेल्या पत्रानंतर सोमवारी दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला व तो अन्यत्र दफन करण्यात आला. त्यानंतर मृतदेह दफन प्रकरणावर पडदा पडला असल्याचे सर्वांनीच जाहीर केले.
दरम्यान, नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाविरोधात पुकारलेल्या आत्मक्लेश आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा लाभला. निरवडे येथील जीवनसंध्या आश्रमात आश्रित असलेल्या मरसियाना सबिना फ्रान्सिस्को आल्मेडा या महिलेचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह १२ एप्रिलला श्रमविहार कॉलनीतील घराच्या शेजारी असलेल्या जागेत दफन करण्यात आला होता. गेले तेरा दिवस विविध पातळीवर स्थानिक रहिवाशांचे आंदोलन सुरू होते.
घटनेच्या सहाव्या दिवशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ख्रिश्चन समाज व श्रमविहार कॉलनीतील नागरिकांशी वेगवेगळी चर्चा केली; पण ही चर्चा करताना मंत्री केसरकर यांनी प्रथम ख्रिश्चन समाजाशी चर्चा करून जो निर्णय घेतला, तो नगरपालिका सभागृहात उपस्थित असलेल्या श्रमविहार कॉलनीतील नागरिकांवर लादण्यात आला होता. यावेळी प्रशासनानेही पालकमंत्र्यांचीच री ओढली होती.
पालकमंत्र्यांच्या निर्णयाने स्थानिक नागरिक तसेच नगराध्यक्ष बबन साळगावकर हे चांगलेच नाराज झाले होते. पालिकेने ख्रिश्चन समाजाशी केलेल्या करारावरही नगराध्यक्षांनी सही केली नव्हती. तसेच श्रमविहार कॉलनीतील नागरिकांनीही हा करार बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. स्वराज्य संघटना तसेच विश्व हिंदू परिषद यांनी मृतदेह दफनप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. हा वाद वाढत जात असताना रविवारी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्र्यांच्या एकतर्फी निर्णयामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचे सांगून थेट पालकमंत्र्यांवरच शाब्दिक हल्ला चढविला व सोमवारी आपण या निर्णयाविरोधात आत्मक्लेश करणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर पोलिस प्रशासन चांगलेच हादरले होते. त्यांनी रात्रीच सूत्रे हलविली. ख्रिश्चन समाजाच्या तसेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चाही केली. त्यानंतर रात्री उशिरा ख्रिश्चन समाजाच्यावतीने धर्मगुरू इलियास रॉड्रिक्स यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी नगरपालिकेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पत्र दिले. या पत्रात त्यांनी मृतदेह काढताना एकही ख्रिश्चन बांधव उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते.
या पत्रानंतर सोमवारी सकाळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे तसेच तहसीलदार बी. बी. जाधव, पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस व पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची संंयुक्त बैठक झाली आणि मृतदेह काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे सकाळी ९.३० वाजता पालिका कर्मचाऱ्यांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी प्रशासनाच्यावतीने पंचही नेमण्यात आले. तसेच व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. हा मृतदेह बाहेर काढण्यात आला व तो अन्यत्र दफन करण्यात आला. ही कारवाई दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिस, महसूल विभाग व नगरपालिका यांच्यावतीने पूर्ण करण्यात आली.
यावेळी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, प्रभारी तहसीलदार भास्कर जाधव, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, दीपक म्हापसेकर, तानाजी पालव, आसावरी शिरोडकर, आदी उपस्थित होते. मृतदेह काढताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)

ख्रिश्चन धर्मगुरूंच्या पत्रानंतर कार्यवाही
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सतत होणारी आंदोलने, मोर्चा यामुळे पोलिस प्रशासनही हैराण झाले होते. त्यातच जो करार करण्यात आला होता, तोही बेकायदा असल्याचा दावा करण्यात आल्याने अखेर पोलिसांनी ख्रिश्चन धर्मगुरूंशी चर्चा केली. त्याचवेळी धर्मगुरूंनी आमचे कायदा सुव्यस्थेला पहिले प्राधान्य राहणार असल्याचे सांगत मृतदेह तुम्ही बाहेर काढा, ख्रिश्चन बांधव कोणीही तेथे येणार नाही, असे सांगत तसे पत्र दिले.
पालकमंत्र्यांचा निर्णय अधिकाऱ्यांनाच अमान्य
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला निर्णय खुद्द जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच अमान्य असल्याचे दिसून आले. अनेक अधिकारी पालकमंत्र्यांच्या निर्णयानंतर आपल्यावर टांगती तलवार येऊ नये, यासाठी दीर्घकालीन सुटीवर गेले आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हेही सुटीवर आहेत, तर सावंतवाडी तहसीलदार यांनीही सुटी वाढवून घेतल्याची चर्चा आहे.

Web Title: The body of the deceased is buried somewhere else

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.