Sindhudurg Crime: बांदा बसस्थानकानजीक सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:22 PM2023-02-02T17:22:53+5:302023-02-02T17:23:18+5:30
मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अस्पष्ट
बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा बसस्थानकानजीक ढाब्यासमोर दुभाजकात सडलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. डंपरचालकाच्या निदर्शनास मृतदेह पडल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली. बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळेव कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. सदर इसम सडलेल्या स्थितीत असल्याने चेहऱ्याचा भाग विद्रूप झाल्याने ओळख पटलेली नाही. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा बसस्थानक नजीकच्या ढाब्यासमोर दुभाजकामध्ये सडलेल्या स्थितीत मृतदेह असल्याची माहिती डंपरचालकाने दिली. सदर इसमाच्या अंगावर खाकी शर्ट व राखाडी कलरची पँट होती. मृतदेह पूर्णपणे कुजून गेला होता. दुभाजकात गवत वाढल्याने तो कोणाच्याही निदर्शनास पडला नाही.
बांदा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आरोग्य केंद्रात आणला. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केले. मृत ४० ते ४५ वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले. ३ ते ७ दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. मृतदेहावर कोणत्याही जखमा नव्हत्या. मृताचा मृ्त्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.