Sindhudurg: तिलारीच्या कालव्यात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह, साथीदार बेपत्ता झाल्याने संशयात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:58 IST2025-01-22T11:58:30+5:302025-01-22T11:58:59+5:30

दोडामार्ग : साटेली-भेडशी येथे जेवण करण्यासाठी एकाच वेळी बाहेर पडलेल्या दोघा बेपत्ता कामगारांपैकी एकाचा तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात मृतदेह ...

Body of migrant worker found in Tilari canal, suspicions rise as companion goes missing | Sindhudurg: तिलारीच्या कालव्यात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह, साथीदार बेपत्ता झाल्याने संशयात वाढ

Sindhudurg: तिलारीच्या कालव्यात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह, साथीदार बेपत्ता झाल्याने संशयात वाढ

दोडामार्ग : साटेली-भेडशी येथे जेवण करण्यासाठी एकाच वेळी बाहेर पडलेल्या दोघा बेपत्ता कामगारांपैकी एकाचा तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत कामगाराचे नाव इराप्पा ऊर्फ संजू नागप्पा मुकुलकट्टी (३८) रा. हिरेहोणारी धारवाड, कर्नाटक असे असून त्याच्या कपाळावर जखमा आढळल्याने हा घातपात तर नाही ना? असा संशय वर्तविला जात आहे. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा कामगार मंजुनाथ होडागी (३८) हा अद्यापही बेपत्ता असल्याने या घटनेचे गूढ आणखीनच वाढले आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मृत इराप्पा ऊर्फ संजू नगाप्पा मुकुलकट्टी व बेपत्ता मंजुनाथ होडागी हे दोघेही सहा महिन्यांपूर्वी खानयाळे येथे बांधकाम कामगार आले होते. ते खानायाळे येथे एका फार्म हाऊसवर गवंडी काम करीत होते. अन्य साथीदारासोबत तेथेच एका खोलीत राहत होते. सोमवारी संध्याकाळी ते दोघे जेवणाच्या निमित्ताने भेडशी बाजारपेठेत आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत रूमवर परतले नसल्याने त्याचा अन्य साथीदारांनी शोध घेतला. पण दोघेही कोठेच सापडले नाहीत.

दुपारी शोध घेत असता साटेली-भेडशी थोरले भरड येथे कालव्यातील गेटला अडकलेल्या बांबूला मृतदेह अडकून पाण्यावर तरंगत असल्याचे दृष्टीस पडला. त्यांनी ही माहिती आपल्या मुकादमाला दिली. मुकादमाने पोलिसांना माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. तो शवविच्छेदनासाठी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.

बेपत्ता साथीदारामुळे घटनेचे गूढ वाढले

जेवणासाठी एकाच वेळी बाहेर पडलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडतो आणि दुसरा बेपत्ता होतो. या घटनाक्रमामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. शिवाय मृताच्या कपाळावरसुद्धा खुणा आढळल्याने हा घातपात तर नाही ना? असा तर्क लढविला जात आहे. एकंदरीत काय तर दुसऱ्या साथीदाराच्या बेपत्ता होण्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

Web Title: Body of migrant worker found in Tilari canal, suspicions rise as companion goes missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.