सुरक्षारक्षकाचा मृतदेह कर्ली नदीत आढळला
By admin | Published: July 3, 2016 11:06 PM2016-07-03T23:06:35+5:302016-07-03T23:06:35+5:30
रात्री उशीरा मृतदेहाचे शवविच्छेदन
कुडाळ : बेपत्ता असलेले कुडाळ येथील भुजल सर्व्हेक्षण विभागाचे सुरक्षारक्षक विनायक राऊळ (वय ५२, रा. लक्ष्मीवाडी, कुडाळ) यांचा मृतदेह कोरजाई येथील कर्ली नदी पात्रात आढळून आला.
कुडाळ लक्ष्मीवाडी येथे राहणारे विनायक राऊळ हे कुडाळ येथील भुजल सर्व्हेक्षण विभागाचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. ३० जुन रोजी त्यांनी रात्रपाळीचे काम करून ते सकाळी घरी आले व पुन्हा कामाला जाणार असून १०.३० वाजेपर्यंत पुन्हा घरी येईन असे त्यांनी पत्नीला सांगितले होते. परंतु त्या दिवशी सांयकाळ झाली तरी ते घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू होती मात्र ते उशिरापर्यंत सापडलेच नाहीत. त्यामुळे कुडाळ पोलिस ठाण्यात विनायक राऊळ हे बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली होती.
रविवारी दुपारी कोरजाई येथील कर्ली नदी पात्रात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना तेथील मच्छिमार व्यावसायिकांना दिसून आला. मच्छिमारांनी याबाबत निवती पोलिसांना कळविले. त्यांनी घटनास्थळी जात तो मृतदेह बाहेर काढला. तसेच याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यालाही माहीती देण्यात आली.
रविवारी सांयकाळी उशीरा हा मृतदेह कुडाळ ग्रामिण रूग्णालय येथे आणण्यात आला. कुडाळ पोलिसांनीही याबाबत तपास केला असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या विनायक राऊळ यांचा असल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे कुडाळ पोलिसांनी राऊळ यांच्या कुटुंबियांना बोलावून घेत मृतदेह ओळख पटविण्यासाठी दाखविला असता हा मृतदेह विनायक राऊळ यांचाच असल्याचे त्यांनी सांगितले.
राऊळ यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचा मृतदेह कुडाळ शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. शवविच्छेदन गृहात योग्य प्रकारे विद्युत पुरवठाही नव्हता. तसेच काही वेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. या प्रकाराबाबत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. रात्री उशीरा मृतदेहाचे शवविच्छेदन केले. (प्रतिनिधी)