नरडवे येथील नदीपात्रात मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 01:32 PM2021-07-30T13:32:10+5:302021-07-30T13:34:25+5:30
Crimenews Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील नरडवे घोलणवाडी परिसरातील नदीपात्रात एका तीस ते पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, अजूनही त्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कणकवली : तालुक्यातील नरडवे घोलणवाडी परिसरातील नदीपात्रात एका तीस ते पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, अजूनही त्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नरडवे घोलणवाडी येथील काही ग्रामस्थांना गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी कणकवली पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक अजमुल्ला खान , उपनिरीक्षक अनमोल रावराणे, हवालदार वैभव कोळी तसेच पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट दिली.
तसेच ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन त्याची ओळख पटविण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. तसेच नरडवे येथील कोणालाही त्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नव्हती.
दरम्यान, २२ जुलै पासून सह्याद्री पट्ट्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्यात संबधित तरुण बुडाला असावा किंवा त्याने आत्महत्या केली असावी? तसेच त्याचा कोणी घातपात केला का ? या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत या घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती समजू शकलेली नाही.
यापूर्वीही नरडवे गावात जळालेल्या अवस्थेत एक व्यक्ती आढळून आली होती. त्या व्यक्तीबद्दलही पोलिसांना अजूनही काही माहिती समजलेली नाही. तसेच त्या व्यक्तीचीही ओळखही पटलेली नाही. त्यामुळे गुरुवारी मिळालेल्या या दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.