मातीनाला बंधाऱ्यात युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 05:36 PM2019-11-08T17:36:52+5:302019-11-08T17:38:19+5:30
बांदा : भालावल - धनगरवाडी येथील समीर धुळू कोकरे (२१) या युवकाचा मृतदेह मातीनाला बंधाºयात संशयास्पदरीत्या आढळून आल्याने एकच ...
बांदा : भालावल - धनगरवाडी येथील समीर धुळू कोकरे (२१) या युवकाचा मृतदेह मातीनाला बंधाºयात संशयास्पदरीत्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह गुरुवारी सकाळी लगतच्या बंधाऱ्यात आढळून आल्याची तक्रार धोंडू बाबू कोकरे यांनी बांदा पोलिसांत दिली. मृतदेह विच्छेदन अहवालात समीरचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी स्पष्ट केले. बांदा पोलिसांत याबाबच आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.
बांदा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी समीर व अन्य तीन मित्रांसमवेत नजीकच्या मातीनाला बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेला होता. सायंकाळी शेजारील व्यक्तीला बोकड घरी आणताना समीरचा मोबाईल वाटेत मिळाला होता. त्यानंतर त्याने घरातील व्यक्तींना समीरचा मोबाईल मिळाल्याचे सांगितले.
त्यावेळी दुपारी गेलेला समीर आंघोळीहून घरी आला नाही हे घरात व शेजाऱ्यांना समजले. स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईकांनी बुधवारी सायंकाळी बंधारा परीसरात शोधाशोध सुरू केली. उशिरा बंधाऱ्यानजीक समीरचे कपडे व चप्पल आढळून आले. रात्री उशीरापर्यत शोधाशोध करुन समीर सापडला नाही. रात्र उशीर झाल्या शोध कार्यात अडथळा आल्याने शोध कार्य थांबविण्यात आला.
गुरूवारी सकाळी वाडीतील ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबविली. त्यावेळी बंधाऱ्यात समीरचा मृतदेह आढळून आला. या शोधकार्यात पंचक्रोशीत समाजसेवेकांनी मदत कार्यासाठी धाव घेतली.
भालावल उपसरपंच समीर परब, ग्रामपंचायत सदस्य उदय परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, तांबुळी माजी सरपंच शिवराम सावंत, माजी डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, माजी उपसरपंच अशोक परब, विठु कोकरे, भागू लांबर, विलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, विठ्ठल दळवी आदींनी मदतकार्यात सहभाग दाखविला.
बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. यावेळी दुपारी मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात आणण्यात आला. समीरच्या पश्चात आई-वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.
सायंकाळी उशीरा मृतदेहाचे विच्छेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी केले. अहवालात समीरचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे नमूद करण्यात आले. बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.
कपडे, मोबाईल वेगवेगळ््या ठिकाणी
समीरच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार तो कधीही बंधाऱ्यात आंघोळीसाठी जात नसे. त्याचे कपडे, मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी सापडून आले आहेत. बंधाऱ्यात सुमारे १५ ते २० फूट खोल पाणीसाठा आहे. त्याला पोहता येत नसल्याने तो मागाहून पाण्यात आंघोळीसाठी एकटाच उतरला होता का ? असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण तो पोहण्यात तरबेज नव्हता.