रेल्वे स्थानकात ‘बॉम्ब’....?
By admin | Published: March 27, 2016 01:01 AM2016-03-27T01:01:36+5:302016-03-27T01:01:36+5:30
कणकवलीत पोलिसांची रंगीत तालीम : जनतेमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न : पद्मजा चव्हाण
कणकवली : सकाळी ९.३0 ची वेळ....कणकवली रेल्वे स्थानकात बाँब ठेवण्यात आल्याचा पोलिस स्थानकात निनावी फोन, पोलिसांची धावपळ सुरु, ओरोस येथील बाँब शोधक पथकाला पाचारण, अग्निशामक यंत्रणा तसेच रुग्णवाहिकाही रेल्वेस्थानक परिसरात दाखल, रेल्वे स्थानकातील प्रवाशांना प्लॅटफार्मवरुन खाली आणण्यात आल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून बॉम्ब निकामी आणि रेल्वे प्रवाशांसह सर्वांनिच सोडला सुटकेचा नि:श्वास......हा घटनाक्रम आहे, कणकवली रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा पोलिस स्थानकात आलेल्या निनावी फोन नंतरचा.
याबाबत असे झाले की, कणकवली रेल्वे स्थानकात बाँब ठेवण्यात आला असल्याचा निनावी फोन आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांच्यासह पोलिस पथक रेल्वेस्थानकात दाखल झाले. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अब्दुल सत्तार व इतरही सतर्क झाले. तर अवघ्या २0 मिनिटांत ओरोसवरुन बॉम्ब शोधक व नाशक पथकही कणकवली रेल्वेस्थानकात पोहचले. त्यांनी टायगर या श्वानासह संशयास्पद वस्तुचा शोध घेतला असता त्यांना प्लॅटफॉर्मवरील योगेश बुक स्टॉल खाली एक बेवारस बॅग आढळून आली. एवढ्या वेळात पोलिसांनी प्रवाशांना खाली पाठवित कणकवली रेल्वे स्थानकही मोकळे केले.
त्यानंतर बॉम्बसदृश वस्तू ठेवलेली सुटकेस बॉम्बशोधक पथकाने रोपद्वारे बाहेर काढली. तसेच बॅगचे एक्सरे स्कॅनिग सुरु केले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रमुख संजय कातीवले यांच्या नेतृत्वाखाली के. डी. परुळेकर, लक्ष्मण तवटे, पी. एन. नाईक, व्ही. व्ही. वरवडेकर, एस. पी. साटम, जी. जी. राणे. एस. एम. शिंदे आदींच्या पथकाने पुढील कार्यवाही सुरु केली. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ती सुटकेस बॉम्बशोधक व नाशक पथकाने मोकळ्या जागेत नेऊन रिमोट एन्ट्रीद्वारे स्फोट करून उघडली. या सुटकेसमध्ये त्यांना भिंतीवरील एक घड्याळ आणि बॉम्ब सदृश साहित्य आढळून आले. मात्र, या साहित्याचा काहीच धोका नसल्याचे त्यांनी जाहिर केले. तसेच प्रवाशांनी घाबरु नये असे आवाहन केले. आणि तब्बल दीड तासाहून अधिक काळ चाललेला हा थरार संपला.
ही सर्व कारवाई संपल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी सर्व घटनेबाबतचा प्रसिद्धीमाध्यमांसमोर खुलासा केला. ब्रुसेल्स येथे झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने पोलिसांनी आपत्कालीन यंत्रणेची रंगीत तालीम कणकवली रेल्वेस्थानकात घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जनतेत अशा घटनांबाबत जागृती होण्यासाठीच ही रंगीत तालीम घेतल्याचे सांगितले. जनतेने अशा घटनांच्या वेळी घाबरुन न जाता प्रसंगावधान राखत पोलिसांना माहिती द्यावी. आपली सर्व प्रशासकीय यंत्रणा अशा घटनाना तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा अलर्ट असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी संतोष भिसे, परमेश्वर फड आदी महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या रंगीत तालीमीमुळे प्रवाशांत भितीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून दिवा पॅसेंजर रेल्वे स्थानकातून मार्गस्थ झाल्यावर कार्यवाही करण्यात आली. तर मांडवी एक्सप्रेस स्थानकात येण्यापूर्वी ही रंगीत तालीम संपविण्यात आली. (वार्ताहर)
जिल्ह्यात बातमी पसरली : आणि...मनात दाटलेली भीती कमी झाली!
कणकवली रेल्वे स्थानकात बॉब ठेवण्यात आल्याची माहिती शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. आणि सर्वत्र चिंतेचे सावट पसरले. अनेक नागरिकांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. पुढे काय होणार या विचारामुळे सर्वांच्या मनात भीति निर्माण झाली होती. मात्र, बॉम्ब निकामी झाल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी ब्रुसेल्स येथील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कणकवलीत आपत्कालीन यंत्रणेची रंगीत तालीम केल्याचे स्पष्ट केले. आणि इतका वेळ मनात दाटलेली भीती काहिशी कमी होऊन सर्वांचाच जिव भांड्यात पडला.