स्वत:ची शिक्षा लांबवण्यासाठी बॉम्बची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2015 11:46 PM2015-09-05T23:46:34+5:302015-09-05T23:51:07+5:30
युवक सावंतवाडीतील, सिमकार्डसह मोबाईल जप्त
सावंतवाडी : सावंतवाडी व कुडाळ न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या युवकाला पोलिसांनी सावंतवाडीतून ताब्यात घेतले आहे. धनादेश अनादर प्रकरणात स्वत:ची शिक्षा टाळण्यासाठीच ही अफवा पसरवल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. साईनाथ दाजी गवस (वय ३४, रा. सालईवाडा, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. पोलीस कॉल डिटेल्स आल्यानंतर अटकेची कारवाई करणार आहेत. युवकाने केलेला कॉल हा गहाळ सिमकार्डवरून केल्याचे पोलीस तपासात पुढे आल्यानंतर सिमकार्डसह मोबाईल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी दिली आहे.
१४ आॅगस्टला सावंतवाडी व कुडाळ येथील न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी गोवा पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. गोवा नियंत्रण कक्षाने याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांबरोबरच ओरोस पोलीस मुख्यालयाला दिली होती. त्यानंतर जोरदार तपासणी करण्यात आली. त्यामुळे कुडाळसह सावंतवाडीच्या न्यायालयाचे कामकाजही बंद राहिले होते.
१५ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेने खास खबरदारी घेतली होती. खरोखरच दहशतवादी कृत्य तर नाही, ना अशी शंका सर्वांनीच उपस्थित केली होती. त्यामुळे पोलीस याचा सूत्रधार शोधत होते. त्याचवेळी हा कॉल सावंतवाडी तालुक्यातून आल्याचे पोलिसांना घटनेच्या दिवशीच कळले होते. पोलिसांनी भ्रमणध्वनीचा नंबर शोधून काढला. त्यावेळी हा नंबर मूळचा कुणकेरी मात्र सध्या कोलगाव येथील युवकाचा असल्याचे तपासात पुढे आले होते. पोलिसांनी रात्री त्या युवकाला ताब्यातही घेतले होते. पण त्याने आपले सिमकार्ड वर्षभरापूर्वीच हरवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही या युवकाच्या पार्श्वभूमीविषयी खातरजमा केल्यानंतर त्याला सोडून दिले होते.
पोलिसांनी न्यायालयात १४ आॅगस्टला होणाऱ्या शिक्षेची तसेच अन्य माहिती गोळा केली. त्यावेळी पोलिसांचा संशय साईनाथ गवस या युवकावर गेला. १८ आॅगस्टला या युवकाला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. तपासात त्याने प्रतिसादही दिला. त्याने घडलेला प्रकार पोलिसांजवळ कथन केला. साईनाथ याने कोलगाव येथील युवकाच्या गहाळ सिमकार्डवरून गोवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षात भ्रमणध्वनी केला होता. त्यादिवशी धनादेश अनादर प्रकरणाचा अंतिम निकाल होता. साईनाथला शिक्षा होणार होती. याची कुणकुण लागल्याने सकाळी त्याने पत्नीला न्यायालयात पाठवून आपण मुंबईला गेलो आहे. त्यामुळे पुढची तारीख मिळावी, असा विनंती अर्ज करण्यास सांगितले होते. पण न्यायालयात असणारा एक कर्मचारी साईनाथच्या घराशेजारी राहातो. त्याने साईनाथला सकाळीच घरी पाहिले होते. त्यामुळे असा अर्ज करणे योग्य नसल्याचे त्या कर्मचाऱ्याने साईनाथच्या पत्नीला सांगितले. तसेच पुढची तारीख न्यायालयाने देण्यास नकार दिला होता.
यामुळे साईनाथ चांगलाच घाबरला होता. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले होते. दरम्यान, पोलिसांना साईनाथने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पण कॉल डिटेल्सचा अहवाल येणे बाकी असून, तो आल्यानंतर पोलीस त्याला येथील न्यायालयात हजर करणार आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईलसह दोन सिमकार्डही ताब्यात घेतली असून ती तपासणीसाठी पाठवण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, साईनाथ याने जो खटला लांबवण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा निकाल २ सप्टेंबरला लागला असून त्यात त्याला एक महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. सिंधुदुर्ग चिटस् प्रायव्हेट कंपनी सावंतवाडी शाखेचे फोरमन अनंत पवार यांनी धनादेश अनादर प्रकरणी हा खासगी खटला येथील न्यायालयात दाखल केला होता. त्यात साईनाथला शिक्षा झाली आहे. साईनाथ हा सावंतवाडीत रहात असून खासगी गाड्यांवर चालकाचे काम करीत आहे. (प्रतिनिधी)