बांबवडेत वाहतुकीच्या कोंडीची ‘कोंडी’ फुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 10:02 PM2016-01-14T22:02:43+5:302016-01-15T00:45:52+5:30
नियोजनच नाही : शिस्त लावण्याची गरज; वाहनचालक त्रस्त
रामचंद्र पाटील-- बांबवडे (ता. शाहूवाडी) या तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला नियोजनाअभावी वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत असून, सर्व स्थरावर प्रयत्न करून बाजाराचे योग्य नियोजन लावणे गरजेचे आहे.
बांबवडे हे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वसलेले असून, येथील आठवडी बाजार गुरुवारीच भरतो. या मार्गालगतच मुख्य बाजारपेठ आहे. या आठवडी बाजारामध्ये शाहूवाडीसह पन्हाळा व शिराळा तालुक्यांतील व्यापारी लोक येतात. तसेच महामार्गावर प्रवास करणारे प्रवासीही खरेदीसाठी थांबत असल्याने बाजारपेठेत गर्दी झालेली असते.
मुख्य बाजार हा बसस्थानक परिसरात भरतो. येथूनच महामार्गावर जाता येते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान-मोठी वाहने उभी असतात. दर पाच मिनिटाला एक ते दोन बस येथे थांबलेल्या असतात. त्यांच्या थांबण्याचे योग्य नियोजन नसते. दोन्ही बाजूला एक-दोन एस.टी. बसेस जरी थांबल्या तरीही वाहतुकीची कोंडी होते. यासाठी जाणाऱ्या गाड्या बसस्थानकाच्या बाजूला, तर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या विरुद्ध बाजूला उभ्या राहण्यासाठी मलकापूर आगाराच्या स्वतंत्र कर्मचाऱ्याने पोलिसांच्या मदतीने नियोजन लावणे गरजेचे आहे.
खासगी वाहतूक करणारी शेकडो वाहने याच परिसरात उभी राहिलेली असतात. यामुळे वाहतुकीची खरी कोंडी होते. आठवडी बाजारादिवशी ही वाहने या परिसरापासून दूर उभी राहण्याची व्यवस्था केली तर कोंडी सुटण्याची शक्यता आहे. परंतु, हे नियोजन लावण्याचे धारिष्ट बांबवडे पोलिसांत नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
येथेच भरणारा भाजीपाला मार्केट या परिसरातून वेगळ्या ठिकाणी भरविणे गरजेचे आहे. भाजीपाला मार्केट थोडेसे एका बाजूस तरी भरते; परंतु फळविक्रेते अगदी रस्त्यावरच फळांचे गाडे व ठेले मांडून बिनधास्त बसलेले असतात. अशीच परिस्थिती पिशवी येथील रोडवरही होते. तेथेही नेहमी वाहतुकीची कोंडी होते. तरी जनावरांच्या बाजाराशेजारी जे मार्केटचे गाळे आहेत तेथे बाजार भरणे गरजेचे आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नोकरदार वर्ग कामावरून आल्यावर प्रत्येकाचे वाहन जागा मिळेल तेथे पार्किंग होते. या वेळेत वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतूक व बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही वाहतुकीची कोंडी होते.
ऊस, बॉक्साईट वाहतूक
सध्या ऊस आणि बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही कोंडीत भर पडत आहे.
आठवडा बाजारादिवशी तर येथे चालणेही मुश्कील होते.