त्या पुस्तकावर बंदी घालावी : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:53 PM2020-01-13T12:53:59+5:302020-01-13T12:56:58+5:30
काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंदी घालून लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मालवण : काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंदी घालून लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने कुडाळ-मालवणच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना मालवण तहसील कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते शिवाजी देसाई, मधुसूदन सारंग, अशोक ओटवणेकर, चंद्रकांत भोजने, अनिकेत फाटक आदी उपस्थित होते.
वीर सावरकर कितने वीर? या पुस्तकात ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशहितासाठी व देशाच्या अस्मितेसाठी आयुष्य वेचले, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले आहेत. लेखकाने सावरकर व नथुराम गोडसे यांच्याविषयी चुकीची व अश्लाघ्य माहिती पुस्तकातून प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी.
यापुढे सावरकर यांचाच नव्हे तर कोणत्याही राष्ट्रपुरुषांचा होणारा अपमान थांबविण्यासाठी शासनाने नवीन कायदा बनवावा. त्यात कठोर कारवाईची व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद असावी. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तत्काळ भारतरत्न म्हणून जाहीर करावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.