किनारा स्वच्छता अभियान
By Admin | Published: January 20, 2017 11:02 PM2017-01-20T23:02:18+5:302017-01-20T23:02:18+5:30
उदय चौधरींची माहिती : २४ जानेवारीला जिल्ह्यातील ३४ समुद्र ठिकाणांची निवड
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ११ पर्यंत जिल्ह्यातील ३४ समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून पुढील प्रत्येक महिन्याला या समुद्र किनाऱ्यावर प्रशासनाच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस श्रमदानासाठी सुट्टी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पाणी व स्वच्छता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३४ समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर आदी उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने ही स्वच्छता मोहीम म्हणजे एक सुरूवात असून संबंधित ग्रामपंचायती, माध्यमिक व प्राथमिक शाळांचे विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत या सागर किनाऱ्यांची उत्स्फूर्तपणे वारंवार स्वच्छता होणे अपेक्षीत आहे. मागच्यावर्षी झालेल्या किनारा स्वच्छतेच्या दोन अभियानांमध्ये सुमारे १५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावर्षीही अशा मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सहभागासह अभियान राबविण्याची अपेक्षा आहे.
मेरी टाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियानांतर्गत २२ सागर किनारा असलेल्या ग्रामपंचायतींना निधीही दिला आहे. या अभियानात ‘सर्वात स्वच्छ किनारा स्पर्धा’ समाविष्ट आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छतेचा मान सिंधुदुर्गने मिळविलेला असतानाच या सर्वात स्वच्छ किनारा स्पर्धेतही सिंधुदुर्ग अव्वल राहील यादृष्टीने हे स्वच्छता अभियान राबवायचे आहे.
जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रत्येक महिन्याला एक दिवसातील तीन तास स्वच्छतेसाठी द्यावेत. यासाठी त्या कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस कामकाजातून सूट देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. २४ जानेवारी होणाऱ्या या स्वच्छता अभियानात जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी
केले. (प्रतिनिधी)
गतवर्षी मिळालेला उत्तम प्रतिसाद
संपूर्ण भारतात प्रथम पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारा स्वच्छता हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा विषय होता. याच अनुषंगाने मागील वर्षापासून सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे असे सांगून चौधरी म्हणाले की, मागील वर्षी ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक, रबरी वस्तू असा मिळून १६०० गोणी कचरा हा जैविक विघटन होणारा होता तर १ हजार गोण्या यात प्लास्टीक, रबरी वस्तू, काचा यांचा समावेश होता. हा सर्व कचरा वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आला होता. यावर्षी मात्र केवळ ओला व सुका कचरा सोडून उर्वरित जसे प्लास्टीक, काचा, धातूच्या वस्तू हाच कचरा गोळा करण्यात येणार आहे.