लाच घेताना दोघांना अटक
By admin | Published: December 4, 2014 12:55 AM2014-12-04T00:55:45+5:302014-12-04T00:55:45+5:30
दुसरा दणका : उत्पादन शुल्कचा दुय्यम निरीक्षकाचा समावेश
सावंतवाडी : ट्रान्स्पोर्टच्या गाड्या सोडण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना सिंधुदुर्ग जिल्हा भरारी पथकाचा उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक सत्यवान अर्जुन भगत (वय ३०) याच्यासह इन्सुली येथील बाळकृष्ण परशुराम कुडव (वय २७) या दोघांना ठाणे येथील लाचलुचपत विभागाचे परिक्षेत्र अधीक्षक दत्ता कराळे यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. काल, मंगळवारीच सावंतवाडीत लाच घेताना भूमापकास अटक झाली होती.
ही कारवाई आज, बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ट्रान्स्पोर्टचे मालक गजाली खान (रा. बडोदा, गुजरात) यांच्या तक्रारीनुसार झाराप-पत्रादेवी महामार्गावरील इन्सुली-डोंबवाडी येथे करण्यात आली. गुजरात येथील गजाली खान यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. आज ते गोव्याहून गुजरात येथे येत होते. यावेळी त्यांच्या गाड्या सोडण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा भरारी पथकाचा प्रमुख उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. गजाली खान यांनी लाचलुचपत विभाग ठाणे पालघर यांना माहिती दिली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून गजाली यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना बाळकृष्ण कुडवला पकडले. ही रक्कम भगत याच्यावतीने बाळकृष्ण कुडव याने स्वीकारली होती. त्यामुळे भगत याला ओरोस येथून ‘तुमचे काम झाले आहे, तुम्ही या’, असे सांगून इन्सुली येथे बोलाविले आणि त्यालाही ताब्यात घेतले. (वार्ताहर)