बांदा-सटमटवाडीत माकडतापाने दोघांचा मृत्यू
By admin | Published: March 3, 2017 11:49 PM2017-03-03T23:49:09+5:302017-03-03T23:49:09+5:30
सटमटवाडी येथे वासुदेव परब आणि संतोष मांजरेकर काही दिवसांपासून तापाने आजारी होते.
बांदा : सटमटवाडी येथील वासुदेव मधुकर परब (वय ५०) आणि संतोष मंगेश मांजरेकर (५५) यांचा माकडतापाने उपचारादरम्यान बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरूअसताना शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. डिसेंबर अखेरपासून बांदा परिसरात माकडतापाचे एकूण ३० रुग्ण आढळले आहेत.एकूण चारजणांचा तापाने बळी घेतल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे येथील आरोग्य सहसंचालकांनी परिसराला व आरोग्य विभागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता.
पहिल्यांदा बांदा-सटमटवाडी, डिंगणे या परिसरात माकडतापाचे रुग्ण आढळले. तद्नंतर याचे लोण बांदापर्यंत पसरले आहे. बांदा-सटमटवाडी येथे वासुदेव परब आणि संतोष मांजरेकर काही दिवसांपासून तापाने आजारी होते. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारादरम्यान त्या दोघांना दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठविला असता तो पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर बांदा येथे उपचार सुरू असताना प्रकृती साथ देत नसल्याने दोघांना गोवा, बांबोळी येथे बुधवारी रात्री हलविण्यात आले. गोवा येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नसल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू ठेवले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संतोष मांजरेकर यांचा मृत्यू झाला. तर साडेसातच्या सुमारास वासुदेव परब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष मांजरेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, ते शेती बागायती करून उदरनिर्वाह करीत होते. वासुदेव परब यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून तेही शेतीची कामे करीत होते. (प्रतिनिधी)