ओहोळात दोघे वाहून गेले
By admin | Published: July 10, 2017 12:43 AM2017-07-10T00:43:18+5:302017-07-10T00:43:18+5:30
ओहोळात दोघे वाहून गेले
लोकमत न्यूज नेटवर्क
चौके : धामापूर कासारटाका येथे धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या अणाव (सुकळवाड) येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. जेवण आटोपून ओहोळात हात धुण्यासाठी ते गेले असता अचानक वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे कर्मचारी वाहून गेल्याची घटना घडली. यात सुदाम आप्पा देऊलकरने झाडाच्या वेलीचा आधार घेतल्याने तो बालंबाल बचावला, तर त्याच्यासोबत वाहून गेलेला सोमनाथ दिगंबर पाटकर (वय ३०, रा. अणाव-दाभाचीवाडी) हा बेपत्ता झाला असून, जिल्हा प्रशासन, स्थानिक नागरिक, स्कुबा डायव्हर यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र, सोमनाथ याचा शोध लागला नव्हता. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
धार्मिक पर्यटनासाठी कासारटाका येथे अणाव इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे सुमारे दहा ते बारा कर्मचारी रविवारी सकाळी आले होते. दुपारचे जेवण बनविण्याची तयारी सुरू होती.
यावेळी ओहोळाच्या पाण्यात हात धुण्यासाठी ते उतरले होते. शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ओहोळाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने सोमनाथ पाटकर व सुदाम देऊलकर हे दोघेही वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाबरोबर दोघेही कासारटाका येथून धामापूर-आंबेरीच्या दिशेने वाहून गेले. यात सुदाम देऊलकर याने एका झाडाच्या वेलीचा आधार घेत किनारा गाठला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली. या दुर्घटनेनंतर महाविद्यालयाचे कर्मचारी सुन्न झाले होते.
प्रशासनाची धाव
या घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका, पोलीस, तहसील प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मालवण येथील रेहान स्कुबा डायव्हिंगच्या डायव्हर यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू ठेवली. पाण्याच्या प्रवाहाची दिशा आंबेरीच्या दिशेने असल्याने आंबेरीच्या दिशेने शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार शरद गोसावी, मंडळ अधिकारी कर्पे, तलाठी जे. आर. परब, आंबेरी सरपंच उदय केळुसकर, चौके सरपंच राजा गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. रेहान स्कुबा डायव्हिंगचे जितेंद्र मेस्त्री, योगेश मेस्त्री, अकिल खान, अभिजित शिगले, केशव साठे यांनी शोधकार्य राबविले.