देवगड येथे लाच घेताना दोघांना अटक
By Admin | Published: May 22, 2017 11:38 PM2017-05-22T23:38:09+5:302017-05-22T23:38:09+5:30
देवगड येथे लाच घेताना दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगड : येथील पंचायत समिती कार्यालयातील लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संतोष गणपत भाबल (वय ५१) व खासगी मदतनीस अविनाश लक्ष्मण उपरकर (४८) यांना १५ हजार रुपयांची लाच घेताना देवगड लाचलुचपत विभागाचा पथकाने त्यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी रंगेहात पकडले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मुणगे कारीवणेवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या प्रस्तावास मंजुरी देणे व कार्यारंभ आदेश काढणे यासाठी ही लाच घेण्यात येत होती.
देवगड तालुक्यातील मुणगे कारीवणेवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रस्ताव मुणगे ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती देवगडकडे पाठविला होता. या प्रस्तावास मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यासाठी भाबल यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दहा हजार रुपये व पंचायत समितीमधील वरिष्ठ सहायक लिपिक व अन्य कर्मचारी यांना पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी शाखाअभियंता भाबल यांनी संबंधित सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार प्रसाद जोशी यांच्याकडे १५ मे रोजी केली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत आवश्यक ती कार्यवाही करून याप्रकरणी सोमवारी (दि. २२) पंचायत समिती लघुपाटबंधारे विभाग या कार्यालयात रीतसर सापळा रचून पंधरा हजार रुपयांची लाच घेताना शाखा अभियंता भाबल व त्यांचे खासगी सहायक अविनाश उपरकर यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत विभाग पोलीस उपअधीक्षक शंकर चिंदरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक भार्गव फाले, पोलीस नाईक नीलेश परब, महिला पोलीस नाईक कांचन प्रभू, पोलीस शिपाई महेश जळवी, जितेंद्र पेडणेकर या पथकाने केली. लाचलुचपत विभागामार्फत महिन्याभरातील ही तिसरी कारवाई असून, देवगड पंचायत समितीमध्ये ही दुसरी कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले
शाखा अभियंता भाबल यांनी मुणगे कारीवणेवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी व कार्यारंभ आदेश घेण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. ही लाच त्यांची खासगी व्यक्ती उपरकर यांनी शाखा अभियंता यांच्या कार्यालयातच भाबल यांच्यावतीने त्यांच्याच समोर स्वीकारली होती. या घटनेसंदर्भात अधिक चौकशीकरिता पंचायत समिती देवगड कार्यालयातील वरिष्ठ सहायक स्वप्नजा संतोष बिर्जे यांना ताब्यात घेतले असून, लाच घेतल्याप्रकरणी भाबल व उपरकर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.