सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळलो अन्...

By admin | Published: March 2, 2016 10:57 PM2016-03-02T22:57:10+5:302016-03-02T23:58:24+5:30

हरिशकुमार गौड : पत्नीवरुन टिंगलटवाळी, गाडीवर स्क्रॅच पाडणे, मुलीला रडवणे...रोजचेच रडगाणे!

Bothered the persecution of the co-workers ... | सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळलो अन्...

सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळलो अन्...

Next

सुभाष कदम-- चिपळूण -रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लि. या कंपनीत मी २०१३पासून सेवेत आहे, तेव्हापासून मानसिक छळ सुरु होता. अनेकवेळा पत्नीवरून टिंगलटवाळी केली जायची. माझ्या गाडीवर स्कॅ्रच पाडणे किंवा गाडीची मोडतोड करणे, मुलीला रडवणे अशा घटना सातत्याने घडायच्या. कंपनीची यंत्रणा सतर्क असतानाही अनेकवेळा मला दोष देऊन गोवले जायचे. वरिष्ठांकडे तक्रार करुनही मला न्याय मिळत नव्हता. त्यामुळे मी हैराण होतो. या मानसिक तणावामुळेच माझ्याकडून दोघांच्या हत्येची चूक झाली. माझ्या प्रिय पत्नीलाही गोळी लागली. मला पश्चाताप होतोय, अशी प्रतिक्रिया आरोपी हरिशकुमार गौड याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
हरिशकुमार गौड (३८, रा. जबलपूर, जि. नरसिंगपूर, मध्यप्रेदश सध्या आरजीपीपीएल कंपनी हॉस्टेल, अंजनवेल) हा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचा वरिष्ठ कॉन्स्टेबल म्हणून २०१३मध्ये येथे दाखल झाला. त्याच्यासोबत सध्या त्याची नऊ महिन्यांची गरोदर पत्नी प्रियांका गौड (२९), पावणे चार वर्षांची मुलगी कोशिशी आहेत. येथे सेवेत आल्यापासून सहकारी नेहमी टिंगलटवाळी करायचे. कधी कधी धक्काबुक्की करायचे. सातत्याने मला पत्नीबाबत टॉर्चर करायचे. माझ्यानंतर मेजर शिंदे येथे आले. ते आल्यानंतर या प्रकारात भर पडली. माझे रॅगिंंग केले जायचे. कंपनीच्या आवारात कोणतीही चुकीची घटना घडली, तर येथील आलार्म वाजतो व यंत्रणा सतर्क होते. अन्याय होत असताना मी वरिष्ठांकडे दाद मागितली. पत्नीनेही मेल करून वस्तूस्थिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती, तरीही फारसा फरक पडला नाही.
जखमी पत्नीची सातत्याने तपासणी : प्रियांका अन् बाळ सुखरुप

हरिशकुमार गौड याच्या डाव्या बाजूला हृदयाच्या किंचित वरून गोळी शरीरातून आरपार बाहेर पडली. सुदैवाने तो बचावला, तर त्याची पत्नी प्रियांकाच्या उजव्या बाजूला छातीत गोळी घुसून आरपार बाहेर पडली. दोघांच्याही फुफ्फुसाला गोळी लागली आहे. रात्री २ नंतर ते रुग्णालयात आले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. २४ तास त्यांच्यावर निगराणी ठेवणे गरजेचे आहे. फुफ्फुसाला मार लागल्याने त्यातून हवा कधीही लिक होऊ शकते. पती-पत्नी दोघेही आता अतिदक्षता विभागात आहेत. आम्ही त्यांची पुरेशी काळजी घेत आहोत, असे डॉ. इसाक खतीब व डॉ. शमशुद्दिन परकार यांनी सांगितले.

गौड याची लहान मुलगी कोशिशी ही पावणेचार वर्षाची आहे. आपल्या मुलीला अनेकवेळा रडावे लागले आहे. तिचे वय कमी असल्यामुळे गेल्या वर्षी तिला शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही. आता जे घडले, त्याची सुतराम कल्पना माझ्या घरच्यांना नाही. माझ्या पत्नीला जपा. माझे बाळ सुखरुप असायला हवे, अशी पत्नीची चिंता तो व्यक्त करतो. सध्या त्याच्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. डॉ. सायली माधव यांनी सातत्याने तपासणी सुरू ठेवली आहे. प्रियांका व बाळ सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


आरजीपीपीएल कंपनीमध्ये मंगळवारी रात्री उशिरा हरिशकुमार गौडने मेजर बाळू गणपती शिंदे (रा. मळणगाव, कवठेमहाकांळ, जि. सांगली) व कॉन्स्टेबल रणीश पी. आर. (रा. केरळ) यांच्यावर गोळीबार करुन त्यांना ठार केले. सातत्याने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाने हैराण झाल्यामुळेच गौड यांनी ही कृती केली असल्याचे त्याने सांगितले. आपल्याला जाणीवपूर्वक येथे त्रास दिला जात होता, असेही त्याचे म्हणणे आहे.


गौड याने ज्या रायफलमधून गोळ्या झाडल्या ती रायफल सेमीअ‍ॅटोमॅटिक बनावटीची आहे. ही रायफल ब्रस्टवर ठेवल्यास एकाच वेळी ३ गोळ्या, तर आर मोडवर एकावेळी एकच गोळी सोडते. गौड याने बेछुट गोळीबार केला, त्यावेळी ती आरमोडवर असावी. सहकाऱ्यांना ठार केल्यानंतर त्याची गरोदर असणारी पत्नी समोर आली. त्याने रायफल खेचली व तिच्या छातीत गोळी घुसली. ही गोळी आपण मारली नसल्याचे तो म्हणाला.


अन् स्वप्न भंगले....
केरळ येथील रणीश पी. आर. (२८) हा कॉन्स्टेबल होता. त्याचे लग्न ठरले होते, पुढच्या महिन्यात तो बोहल्यावर चढणार होता. संसाराची सुख-स्वप्न पाहात असताना अचानक काळाने त्याच्यावर घाला घातला आणि हात पिवळे होण्याआधीच त्याच्या जीवनाचा भंडारा उधळला गेला, तर मेजर बी. जी. शिंदे हे सेवानिवृत्तीला आले होते, सहा महिन्यात ते निवृत्त होणार होते. आयुष्याच्या संध्याकाळी सुखाने जगण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.

मी असे का करेन?
आपण आपल्या कुटुंबासह सुखी होतो. माझे वडील हयात नाहीत. परंतु, माझी आई प्राध्यापिका आहे. मी संस्कारी घरातील मुलगा आहे. मी असे का करेन? मी माझ्या पत्नीला का मारेन? माझे माझ्या पत्नीवर प्रेम आहे. आता तर नवीन पाहुणा येणार असल्याने मी तिची नऊ महिने काळजी घेत होतो. जे घडले ते चुकीचे व अर्थहीन आहे. परंतु, रागाच्या भरात एका परमोच्चक्षणी माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर केलेल्या अत्याचाराचा तो परिणाम असल्याचे गौड याने यावेळी बोलताना सांगितले.


पत्नीनेही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीत मंगळवारची रात्र अक्षरश: काळरात्र ठरली. गेले काही दिवस मानसिक स्वास्थ्य हरपलेल्या हरिशकुमार गौंड या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाने बेभानपणे केलेल्या गोळीबारात त्याचे दोन साथीदार ठार झाले. यानंतर त्याने पत्नीला गोळी घालून जखमी केले आणि स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फॉर्सचा जवान असलेला हरिशकुमार गौड हा ‘रत्नागिरी गॅस’मध्ये सीआयएसएफची सेवा बजावत आहे. काही काळापूर्वी रानवी येथे खासगी चाळीत भाड्याने राहात असताना त्याच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हटले जात आहे. कंपनीत सीआयएसएफसारखी भक्कम सुरक्षा व्यवस्था असूनही लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे हायबेसीन पॉर्इंट एलएनजी टर्मिनल दरम्यान ११ केव्ही तांब्याची तार चोरी झाली होती. यादरम्यान काही कारण नसताना गौड याला वरिष्ठांकडून मानहानी स्वीकारावी लागली होती, अशी चर्चा कंपनी परिसरात आहे.
मंगळवारी रात्री ९ वाजता शिफ्ट संपली. ९.१५ पर्यंत सर्व जवान हत्यारे ठेवण्यासाठी शस्त्रागारात जमले. याचवेळी हरिशकुमारने हेडकॉन्स्टेबल रणीश पी. आर. याला शोधून त्याच्यावर गोळीबार केला. यादरम्यान मध्ये पडलेल्या सहाय्यक फौजदार बाळू गणपत शिंदे यांना आपले प्राण गमवावे लागले. बाळू शिंदे हे सुमारे एक वर्षापूर्वीच रत्नागिरी गॅस कंपनीत सुरक्षा विभागात रुजू झाले होते. बेभान झालेल्या हरिशकमारला रोखण्यासाठी त्याची पत्नी प्रियांका गौड पुढे आली. तिच्या खांद्यावर गोळी झाडली. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. कंपनीच्या इतिहासातील सर्वात भयंकर घटना होती. यावेळी परिसरात कमालीचा सन्नाटा पसरला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Bothered the persecution of the co-workers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.