बहिष्काराचे चटके बसले जगदाळे कुटुंबातील मृतदेहालाही!
By admin | Published: March 22, 2016 11:38 PM2016-03-22T23:38:31+5:302016-03-23T00:43:28+5:30
जगदाळे कुटुंब बहिष्कृत असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीत. जगदाळेंच्या घरात दु:खद वातावरण असतानाही आपल्याला काहीच माहीत नाही, असेच भासविण्यात येत होते.
शिवाजी गोरे :: दापोली ::वाळीत कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतरसुद्धा सामाजिक बहिष्काराचे चटके सहन करावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यातील दहेण - कानसेवाडी येथे आज (मंगळवारी) घडला. गेली पाच वर्षे वाळीत पडलेल्या तुकाराम जगदाळे यांची आई आनंदी महादेव जगदाळे यांचा सोमवारी मृत्यू झाला. मात्र बहिष्कारामुळे तब्बल बारा तास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. दापोलीचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर पुढील कार्य सुरळीत पार पडले आणि श्रीमती जगदाळे यांना अग्नी देण्यात आला.पाच वर्षांपूर्वी जगदाळे यांच्या शेजारी घरातील एका मुलीचा मृत्यू झाला होता. मात्र, तुकाराम जगदाळे यांनीच देवदेवस्की केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतर दोन-तीन वेळा पोलिसांकडे तक्रार देऊन बैठक घेण्यात आली होती. परंतु त्यातून कोणताही तोडगा निघाला नव्हता. गेले अनेक दिवस सामाजिक बहिष्कारात जीवन जगणाऱ्या या कुटुंबावर अचानकपणे संकट आले.सोमवारी रात्री ११ वाजता आनंदी जगदाळे यांची प्राणज्योत मालवली. मात्र, जगदाळे कुटुंब बहिष्कृत असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीत. जगदाळेंच्या घरात दु:खद वातावरण असतानाही आपल्याला काहीच माहीत नाही, असेच भासविण्यात येत होते. मंगळवारी सकाळीसुद्धा जगदाळेंच्या घराकडे कोणीही फिरकले नाहीत. त्यामुळे सुमारे बारा तास मृतदेह घरात ठेवण्याची वेळ पीडित कुटुंबावर आली. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मुंगशे यांनी ग्रामस्थांना विनंती केली व तुकाराम जगदाळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून धीर देण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत अखेर दापोली पोलिसांना कल्पना देण्यात आली. दापोलीचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. कायद्याचा बडगाही दाखवण्यात आला. त्यामुळे काही लोकांनी अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली. या एकूणच प्रकरणात हवालदार गणेश कादवडकर, मेजर सुर्वे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
पाच वर्षे वाळीत कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यविधीवर बहिष्कार.
दापोली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाळीत कुटुंबाला केली मदत.
वाळीत कुटुंबाला कोणतीही मदत करायची नाही, असा आहे जात पंचायतीचा फतवा.
आनंदीबाई जगदाळे यांचा अंत्यविधी पोलीस संरक्षणात.
तुकाराम जगदाळे यांचे कुटुंब वाळीत नव्हते. त्यांना कोणीही वाळीत टाकलेले नाही. वैयक्तिक कारणावरुन वाद झाला होता. त्यांनी आपल्या घरी संकट आल्याची माहिती वाडीला दिली असती तर ग्रामस्थ त्यांच्या मदतीला नक्की धावून गेले असते. परंतु तसे काहीही घडले नाही. त्यांनी आम्हाला कळविलेले नाही, त्यामुळे आम्ही गेलो नव्हतो.
- संतोष कानसे, तंटामुक्त अध्यक्ष
तुकारामच्या कुटुंबाला गेली पाच वर्षे वाळीत टाकण्यात आले. मात्र, संकटाच्या वेळी ग्रामस्थांनी मदत करावी, अशी विनंती आपण केली होती. परंतु माफी मागितल्याशिवाय प्रेताला हात लावणार नाही, अशी भूमिका काही गावपुढाऱ्यांनी घेतल्याने पोलिसांना बोलवावे लागले.
- श्रीकांत मुंगशे
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर...
दापोलीचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी मध्यस्थाची भूमिका घेतल्यानंतर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उपसरपंच, पोलीसपाटील व बहुसंख्य ग्रामस्थ अंत्यविधीला उपस्थित राहिले.