बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता मिळवणे आवश्यक : अशोक सोनोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 09:15 PM2018-08-01T21:15:23+5:302018-08-01T21:16:27+5:30
सावंतवाडी : देशात आज पुन्हा एकदा पेशवाई सुरू झाली असून, धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने संपविण्याचे षङ्यंत्र राबविण्यात येत आहे. हे षङ्यंत्र संपवायचे असेल तर बहुजनांनी एक होऊन हातात सत्ता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले.
भारिप बहुजन महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेमार्फत येथील वैश्यभवन सभागृहात संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना सोनोने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर होते. व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस डॉ. सुरेश शेळके, रायगड जिल्हाध्यक्ष दीपक मोरे, रत्नागिरी बौद्ध महासभेचे सुभाष जाधव, रूपेंद्र जाधव, जिल्हा महिला आघाडीप्रमुख भावना कदम, युवक आघाडीप्रमुख प्रदीप कांबळे, कार्याध्यक्ष श्यामसुंदर वराडकर, एस. के. जाधव, मुस्लिम महिला प्रतिनिधी रूजमा शेख, अन्वर खान, वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष तेजस पडवळ, विष्णू आसोलकर, मोहन जाधव आदी उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजमाता सत्वशिलादेवी भोसले व दापोली दुर्घटनाग्रस्तांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सोनोने म्हणाले, आपला शत्रू आणि मित्र बहुजन समाजाने ओळखावा. येत्या निवडणुकीत भारिप स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सुरेश शेळके म्हणाले, बहुजन महासंघात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या रुपात झंझावात सुरू आहे. या झंझावातात बहुजन समाजाने सामील व्हावे. यावेळी अन्वर खान, उमजा शेख, तेजस पडवळ, प्रदीप मोरे आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्यामसुंदर वराडकर यांनी केले. सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी केले. यावेळी विविध समाजाच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
भारिप महासंघाच्या संकल्प मेळाव्यात अशोक सोनोने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदीप मोरे, महेश परूळेकर, श्यामसुंदर वराडकर, सुरेश शेळके आदी उपस्थित होते.