कोकण रेल्वेला पुन्हा ब्रेक
By admin | Published: August 26, 2014 11:02 PM2014-08-26T23:02:43+5:302014-08-26T23:10:36+5:30
करजाडीतील ट्रॅक कमकुवत : अनेक रेल्वे स्थानकांमध्येच; प्रवाशांचे हाल
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर करंजाडी येथे मालगाडीचे डबे घसरलेल्या ठिकाणचा ट्रॅक कमकुवत झाला असल्याने आज, मंगळवारी कोकण रेल्वेच्या वाहतुकीला पुन्हा फटका बसला. त्यामुळे अपघातानंतर २७ तासांनंतर मार्गावरील सुरू झालेल्या वाहतुकीला पुन्हा ब्रेक लागला. मुळातच अनियमित वेळेत धावत असलेल्या गाड्या दुपारनंतर थांबवूनच ठेवल्या गेल्या. मुळात आजही मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा दोन ते नऊ तास उशिराने धावत होत्या. त्यात करंजाडी येथील समस्येमुळे प्रवाशांचे अधिकच हाल झाले.२४ आॅगस्टला झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वेमार्ग ठप्प झाला होता. २५ रोजी सकाळी आठ वाजता मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे.
आज सकाळी मुंबईतून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी सायंकाळी सात वाजता खेडमध्ये पोहोचली. ती सकाळी ११.१५ वाजता रोज रत्नागिरीत येते. त्यामुळे या गाडीच्या प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
करंजाडी येथे जिथे मालगाडीचे डबे उलटले होते, तेथे ५०० मीटर ट्रॅक कमकुवत झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकतर तेथून रेल्वे अतिशय संथगतीने न्यावी लागते आणि एखादी रेल्वे तेथून गेल्यानंतर तातडीने ट्रॅकचे काम करावे लागत आहे. त्यामुळे दुपारी पावणेचार वाजता रत्नागिरी स्थानकात आलेली मांडवी एक्स्प्रेस जवळजवळ साडेचार तास रत्नागिरी स्थानकातच थांबवून ठेवण्यात आली. केवळ मांडवी एक्स्प्रेसच नाही तर इतरही अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून नेमकेपणाने कसलीच माहिती दिली जात नव्हती त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. (प्रतिनिधी)