मच्छिमार व्यावसायिकाकडून लाच प्रकरण :त्या दोघांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:18 PM2020-01-08T17:18:48+5:302020-01-08T17:20:10+5:30

समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीननेट ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना जिल्हा विशेष न्यायाधीश एस. एस. घोडके यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Bribe case from a fisherman businessman: The two are in court custody | मच्छिमार व्यावसायिकाकडून लाच प्रकरण :त्या दोघांना न्यायालयीन कोठडी

मच्छिमार व्यावसायिकाकडून लाच प्रकरण :त्या दोघांना न्यायालयीन कोठडी

Next
ठळक मुद्देमच्छिमार व्यावसायिकाकडून लाच प्रकरण :त्या दोघांना न्यायालयीन कोठडीलाचलुचपत विभागाकडून मालवणात झाली कारवाई

सिंधुदुर्गनगरी : समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीननेट ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना जिल्हा विशेष न्यायाधीश एस. एस. घोडके यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयात ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे मत्स्यव्यवसाय विभागात एकच खळबळ उडाली होती. ३ जानेवारी रोजी रात्री मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने समुद्रात गस्त घालत असताना एका स्थानिक मच्छिमाराचा पर्ससीननेटचा ट्रॉलर पकडण्यात आला होता.

हा ट्रॉलर जप्त करण्यात येईल, अशी भीती घालत या ट्रॉलरबरोबर अन्य एका ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी केली. ही रक्कम दिल्यास मे महिन्यापर्यंत तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रक्कम तीन टप्प्यात द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी संबंधित मच्छिमाराने मान्य केली.

याबाबतची तक्रार त्या मच्छिमार व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचत ४ जानेवारी रोजी सायंकाळी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयात संबंधित मच्छिमार व्यावसायिक पहिल्या हप्त्यातील दोन लाख रुपयांची लाच देण्यास गेला असता ही रक्कम स्वीकारताना सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त व परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना त्या पथकाने धाड टाकत रंगेहाथ पकडले.

दरम्यान, रविवारी या दोन्ही संशयितांना जिल्हा विशेष न्यायाधीश एस. एस. घोडके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोघांनाही ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

मंगळवारी दोघांचीही पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष न्यायाधीश एस. एस. घोडके यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. मत्स्य व्यवसाय आयुक्त वस्त यांच्यावतीने वकील संग्राम देसाई व अविनाश परब यांनी तर परवाना अधिकारी चव्हाण यांच्यावतीने वकील स्वरूप पई व यतीश खानोलकर यांनी काम पाहिले.

मत्स्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर

या कारवाईत लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस हवालदार प्रथमेश पोतनीस, जनार्दन रेवंडकर, पोलीस नाईक अजित खंडे, रवींद्र पालकर हे सहभागी होते. मत्स्य व्यवसाय विभागात झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त हे किनारपट्टीवरील तिन्ही तालुक्यांचा कारभार पाहतात. त्यांच्यावर तसेच नव्यानेच भरती झालेल्या परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोन अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
 

Web Title: Bribe case from a fisherman businessman: The two are in court custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.