लाचप्रकरणी वीज अभियंता ताब्यात, लाचलुचपतची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:22 AM2019-06-04T11:22:07+5:302019-06-04T11:23:13+5:30
ट्रान्सफार्मरमधून वीजपुरवठा सुरू करून देण्यासाठी तब्बल ४३ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कुडाळ येथील वीज वितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता हरी महादेव कांबळे (४२, रा. कुडाळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
कुडाळ : ट्रान्सफार्मरमधून वीजपुरवठा सुरू करून देण्यासाठी तब्बल ४३ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कुडाळ येथील वीज वितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता हरी महादेव कांबळे (४२, रा. कुडाळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
कुडाळ एमआयडीसीतील एका उद्योजकाने त्याच्या कंपनीत वीजपुरवठा होण्यासाठी ट्रान्सफार्मर बसविला आहे. या ट्रान्सफार्मरला डीपी कनेक्शन मिळण्यासाठी कुडाळ येथील वीज वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता हरी कांबळे यांच्याकडे अर्ज दिला होता. मात्र, डीपी कनेक्शन देऊन वीजपुरवठा सुरू करून देण्यासाठी कांबळे याने त्या उद्योजकाकडे सुमारे ४३ हजार रुपयांची मागणी केली होती.
याबाबत संबंधित उद्योजकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे सापळा रचत तक्रारदार उद्योजकाकडून ४३ हजार रुपयांची लाच घेताना कांबळे याला रंगेहाथ पकडले.
दोन दिवसांची मिळाली पोलीस कोठडी
लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या हरी कांबळे याला रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मितेश केणी, जनार्दन जवडकर, सुभाष गवस, निलेश परब यांनी केली. या कारवाईमुळे वीज वितरण विभागात खळबळ उडाली आहे.