चाफेखोल गावकरवाडीत लोकवर्गणीतून साकारणार पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:46 AM2021-01-04T11:46:07+5:302021-01-04T11:49:56+5:30

गेली सहा वर्षे वारंवार मागणी करूनही चाफेखोल मुख्य रस्ता ते गावकरवाडी येथील ओहोळावर पूल बांधण्यासाठी शासनाकडून विकासनिधी मंजूर न झाल्यामुळे अखेर चाफेखोल - गावकरवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून सुमारे २१ लाख रुपये अपेक्षित खर्चाचा पूल बांधण्याचा संकल्प केला आहे

A bridge will be built in Chafekhol village | चाफेखोल गावकरवाडीत लोकवर्गणीतून साकारणार पूल

चाफेखोल - गावकरवाडी येथील ओहोळावर लोकसहभागातून पूल बांधण्याच्या कामाचा शुभारंभ बापू घाडीगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी रिता वायंगणकर, महेश जुवाटकर, दादा नाईक आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देचाफेखोल गावकरवाडीत लोकवर्गणीतून साकारणार पूल बांधकामाचे भूमिपूजन : २१ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित

चौके/सिंधुदुर्ग  : गेली सहा वर्षे वारंवार मागणी करूनही चाफेखोल मुख्य रस्ता ते गावकरवाडी येथील ओहोळावर पूल बांधण्यासाठी शासनाकडून विकासनिधी मंजूर न झाल्यामुळे अखेर चाफेखोल - गावकरवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून सुमारे २१ लाख रुपये अपेक्षित खर्चाचा पूल बांधण्याचा संकल्प केला आहे.

अखिल भारतीय गाबीत समाज शाखा, मालवणचे सल्लागार आणि पडवणे, देवगडचे माजी सरपंच महेश जुवाटकर यांच्या प्रमुख सहकार्यातून आणि प्रेरणेतून गावकरवाडी ग्रामस्थांनी हा पूल बांधण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

घाडीगावकर परिवाराची दहा घरे आणि सुमारे ४० लोकवस्ती असलेल्या गावकरवाडीला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर मध्येच ओहोळाच्या पाण्यातून जावे लागत होते. या त्रासातून सुटका व्हावी यासाठी आता गावकरवाडी ग्रामस्थांनी स्वतः पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुलाच्या कामाचे भूमिपूजन १ जानेवारी रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बापू घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चाफेखोल सरपंच रिता वायंगणकर, आनंद वराडकर, दादा नाईक, शशिकांत घाडीगावकर, प्रकाश सकपाळ, बळीराम शिंदे, प्रफुल्ल पवार, रामचंद्र पवार, सूर्यकांत घाडीगावकर, माळगाव सरपंच निलेश खोत, नितीन माणगावकर, अर्जुन परब, वामन जाधव, रवींद्र गोसावी, आनंद घाडीगावकर, सचिन घाडीगावकर, रमेश घाडीगावकर, संदीप घाडीगावकर, उमेश घाडीगावकर, मंगेश घाडीगावकर, किशोर घाडीगावकर आदी उपस्थित होते.

लोकवर्गणीचा आगळावेगळा आदर्श

गावकरवाडी ग्रामस्थांच्या संकल्पाला मदत म्हणून अनेक हात पुढे आले आहेत. आतापर्यंत सुमारे १३ लाख रुपयांचा निधी जमा झाला. काही दानशूरांनी वाळू, खडी, स्टील तसेच सिमेंट वस्तू स्वरूपात मदत देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे लोकसहभागातून एखादे अशक्य कामही कसे सहजशक्य होते, याचा आगळावेगळा आदर्श ग्रामस्थांनी समाजासमोर घालून दिला आहे.
 

Web Title: A bridge will be built in Chafekhol village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.