मातब्बरांच्या राजकारणाला ब्रेक?
By admin | Published: October 9, 2016 11:28 PM2016-10-09T23:28:45+5:302016-10-09T23:28:45+5:30
वैभववाडीत चर्चेतले मतदारसंघ राखीव : अनेकांची झाली कोंडी, नव्या मतदारसंघाचा शोध
प्रकाश काळे ल्ल वैभववाडी
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वैभववाडीतील ९ पैकी सहा जागांवर महिलाराज दिसणार आहे. उर्वरित पंचायत समितीला २ आणि जिल्हा परिषदेला १ पुरुष उमेदवार निवडून देता येणार आहे. त्यातही काँग्रेस वगळता अन्य पक्षांना राखीव जागांवर योग्य उमेदवार शोधताना नाकीनऊ येण्याची चिन्हे आहेत. गेल्या वेळेपेक्षा यंदा तालुक्यात अनेक मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. त्यातच चर्चेतील मतदारसंघ सलग दुसऱ्यांदा आरक्षित झाल्याने अनेक मातब्बरांच्या राजकीय कारकिर्दीला अल्पविराम मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेकांचे नेतृत्व कायमचे संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी सक्षम नेतृत्वाअभावी तालुक्याच्या विकासाला पुरती खीळ बसणार आहे.
मागील १५ ते २० वर्षांत जयेंद्र रावराणे, नासीर काझी, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, प्रमोद रावराणे, मंगेश लोके, स्नेहलता चोरगे, बाळा हरयाण आदी नेतेमंडळी वैभववाडी तालुक्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. नंतरच्या काळात भालचंद्र साठे, महेश संसारे, बंड्या मांजरेकर यांसारखे नवे नेते तयार झाले. मागील पंचवार्षिक निवडणुकीला लागू झालेल्या ५0 टक्के महिला आरक्षणाने काझींना ‘यू टर्न’ घ्यावा लागला, तर जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठेंसह अनेकांना थांबावे लागले. यांच्यापैकी अरविंद रावराणे वगळता इतरांना आपल्या मतदारसंघात पुन्हा ब्रेक लागला आहे.
वैश्य समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांना बसला. जिल्हा परिषदेचा तिथवली व पंचायत समितीचा भुईबावडा मतदारसंघ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असताना त्यांना त्यावेळी ओबीसी प्रमाणपत्र नसल्याने दोन्ही जागांवर पाणी सोडावे लागले. त्यानंतर आताही तिथवली जिल्हा परिषद अनुसूचित जाती महिला व भुईबावडा पंचायत समिती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे हक्काच्या मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा साठेंची संधी हुकली आहे.
जयेंद्र रावराणेंची स्थितीही साठेंप्रमाणेच झाली आहे. जिल्हा परिषद कोकिसरे मतदारसंघ गतवेळी महिला आणि आता ओबीसीसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे रावराणेंची पुरती कोंडी झाली आहे. नासीर काझी यांना पंचायत समितीवर समाधान मानावे लागले होते. परंतु, आता तिथवली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही आरक्षित झाल्यामुळे काझींना ब्रेक घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघ खुला झाला. मात्र, अरविंद रावराणे यांचा सोनाळी गाव खांबाळे पंचायत समितीत समाविष्ट झाले आहे. त्यामुळे रावराणे उंबर्डेतून आपले नशीब अजमावणार हे निश्चित आहे.लोरे मतदारसंघ ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगेंसह शुभांगी पवार व वैशाली रावराणे या आजी-माजी सभापतींची अडचण झाली आहे. पंचायत समितीचा लोरे मतदारसंघ खुला असला तरी वैशाली रावराणेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे, तर खांबाळे पंचायत समिती गट ओबीसीसाठी आरक्षित झाल्यामुळे सभापती पवार यांनाही थांबावे लागणार आहे.आरक्षणानंतर तालुक्यातील परिस्थितीचा विचार करता बहुतांश दिग्गजांची कोंडी झाली असून पुढील पाच वर्षांसाठी घ्यावी लागलेली विश्रांती काहींची कायमचीच ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भालचंद्र साठेंना कोकिसरेचा पर्याय
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीनपैकी कोळपेमधून अनुसूचित जाती, तर लोरेतून ओबीसी महिला निवडून जाणार आहेत. मग अशावेळी उरलेल्या कोकिसरे या ओबीसी मतदारसंघातून काँग्रेसकडे उपसभापती बंड्या मांजरेकर एकमेव दावेदार आहेत. भाजप किंवा शिवसेनेकडे सध्या जिल्हा परिषदेसाठी या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. परंतु, तालुक्याच्या हिताचा विचार करून काँग्रेसला आक्रमक नेतृत्व जिल्हा परिषदेत पाठवावेच लागणार आहे. त्यासाठी कोकिसरेच एकमेव पर्याय असल्याने पक्ष तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांना या मतदारसंघात उतरवून आक्रमक नेतृत्वाची उणीव भरून काढू शकते, असा राजकारणातील धुरिणांचा अंदाज आहे.