बौध्दजन संघातर्फे रत्नागिरीत रविवारी धम्म परिषद

By admin | Published: November 17, 2016 10:08 PM2016-11-17T22:08:35+5:302016-11-17T22:08:35+5:30

वि. ल. मोहिते : जागतिक स्तरावरील बौद्ध धम्मगुरूंसह बौद्ध भिक्खूगणांची उपस्थिती

The Buddhist Sangh organized the Dhamma Parishad at Ratnagiri on Sunday | बौध्दजन संघातर्फे रत्नागिरीत रविवारी धम्म परिषद

बौध्दजन संघातर्फे रत्नागिरीत रविवारी धम्म परिषद

Next

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महांसघातर्फे रविवार, २० रोजी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी भारताबरोबरच थायलंड, श्रीलंका, बांगला, जपान, म्यानमार आदी देशांतून बौद्ध भिक्खूगण उपस्थित राहून धम्मदेसना देणार आहेत, अशी माहिती या महासंघाचे सभापती वि. ल. मोेहिते यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
म्यानमार या देशातील बौद्ध राजा थिबा याचे रत्नागिरीत वास्तव्य होते. त्याच्या राजवाड्याच्या रूपाने त्याच्या स्मृती आजही जतन केल्या जात आहेत. कोकणात बौद्ध संस्कृतीचे अनेक घटक पाहायला मिळतात. तसेच हा जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा आहे. त्यांच्या क्रांतीचा उगम कोकणात आहे. त्यामुळे या भूमीला विशेष महत्व आहे. त्यामुळे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाचे तत्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गतिमान करावे, या उद्देशाने जिल्हा बौद्धजन महासंघाने रत्नागिरीत या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले असल्याचे मोहिते यांनी याप्रसंगी सांगितले.
ही परिषद राज्य उत्पादन शुल्कच्या शहरातील कार्यालयाशेजारील थिबा राजाचे पूजास्थळ असलेल्या बुद्ध विहारासमोर सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार असल्याचे मोहिते यावेळी बोलताना सांगितले.
दुसऱ्या सत्रात नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, डॉ. सूर्यकांत देवकेकर, प्रा. दिलीप काकडे, यशवंत जाधव, शर्मिला बारूआ या मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. ही धम्मपरिषद रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे सभापती वि. ल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या धम्म परिषदेत बौद्ध समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात येणार आहेत. त्यात जिल्हा बौध्दजन महासंघाला जागतिक स्तरावर मान्यता मिळणे, राज्यघटनेच्या चौकटी राहून बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा करणे, अल्पसंख्याकांप्रमाणे सवलती मिळणे, जातीच्या दाखल्यामध्ये स्वतंत्र बौद्ध असा उल्लेख असणे तसेच बुद्धगया ही भूमी बौद्ध बांधवांच्या ताब्यात देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच
ही धम्म परिषद केवळ बौद्ध बांधवांसाठी आयोजित करण्यात आली नसून, विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान असलेल्या बौद्ध धम्माची ओळख सर्वांना व्हावी, धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी प्रशिक्षित कार्यकर्ता तयार होण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी राहावी, संस्कार विधीमध्ये एकसूत्रता यावी, धम्मकार्यासाठी आदर्श भिक्खुंची यंत्रणा निर्माण व्हावी आदी अनेक उद्देश या परिषदेमागे आहेत. त्यामुळे सर्व धर्मियबांधवांनीही या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन शेवटी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे सभापती वि. ल. मोहिते यांनी केले.
यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हा बौध्द महासंघाचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)


भन्ते फ्रतेपबोधीविदेस महाथेरो (थायलंड), नभोदीरत्न नायक महाथरो (थायलंड), विमलकीर्ती महाथेरो (श्रीलंका), के. मेधानकरा महाथेरो (श्रीलंका), कल्याणप्रिय महाथेरो (बांगलादेश), सत्यानंद महाथेरो (जपान), चालिंदा महाथेरो, रत्नबोधी महाथेरो, आर्यनाग अत्तदर्शी, सुमेधो महोथेरो, डॉ. हर्षबोधी महाथेरो, बोधीशील महाथरो (भारत) या धम्मगुरूंच्या धम्मदेसनाचा कार्यक्रम पहिल्या सत्रात होणार आहे.

Web Title: The Buddhist Sangh organized the Dhamma Parishad at Ratnagiri on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.