जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प

By Admin | Published: March 22, 2017 11:39 PM2017-03-22T23:39:22+5:302017-03-22T23:39:22+5:30

सिंधुदुर्गनगरी येथील चर्चासत्रातील सूर : तरतुदींचे सकारात्मक परिवर्तन झाले पाहिजे; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल

Budget for the development of the district | जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प

जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प

googlenewsNext



सिंधुदुर्गनगरी : पर्यटन वृद्धीसाठी चालना मिळण्याबरोबरच सिंधुदुर्गच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. याचबरोबर अर्थसंकल्पातील विकास योजनांवर केलेल्या तरतुदींचे सकारात्मक परिवर्तन व्हावे, अस मत राज्याच्या अर्थसंकल्पावर येथे आयोजित चर्चासत्रामध्ये आज व्यक्त करण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालय व सिंधुदुर्ग व सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील पत्रकार कक्षात ‘राज्याच्या अर्थसंकल्पावर’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत, उद्योजक नितीन वाळके, अतुल हुले व ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष राजस रेगे यांनी सहभाग घेतला होता.
चर्चासत्राची सुरूवात अतुल हुले यांनी केली. कोकण व सिंधुदुर्गसाठी अत्यंत आशादायक व सकारात्मक असा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, या योजना तेवढ्याच वेगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. कोकणसाठी स्वतंत्र महामंडळ, जलवाहतूक या बाबतची प्रक्रिया तातडीने कार्यान्वित होणे आवश्यक आहे व स्थानिक प्रशासनाकडून यासाठीची कामे करुन घेणे आवश्यक आहे.
नितीन वाळके यांनी सिंधुदुर्गसाठी उत्कृष्ट असा अर्थसंकल्प असल्याचे मत व्यक्त केले. पर्यटनवृद्धी कोकणातील शेतमालाला योग्य हमी भाव, तिलारी प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद, नारळ व कोकमावरील कमी केलेला कर यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांना चांगले दिवस येतील यात शंका नाही. सिंचनासाठी भरीव तरतूद केल्यामुळे शेतकऱ्यांमधील क्रयशक्तीला चालना मिळेल व उत्पन्नातही वाढ होईल अशी आशाही त्यांनतर व्यक्त केली.
या अर्थसंकल्पात राज्य महिला आयोगाला ७ कोटी रुपयांचे अनुदान दिल्यामुळे महिलांसाठी ही चांगली बाब आहे. अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रुप झालेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी यातून चालना मिळेल असेही जान्हवी सांवत म्हणाल्या. या अर्थसंकल्पात माकडताप संशोधन केंद्र, किशोरवयीन मुलींसाठी उत्कर्षा या योजनेप्रमाणे अस्मिता, कांदळवन संरक्षण, जिल्हा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारे २५ कोटी रुपये हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला भविष्यातील विकासाचे द्योतक आहे असेही त्या म्हणाल्या.
राजस रेगे यांनी सिंधुदुर्गात मत्स्य शेतीला चालना मिळावी म्हणून मत्स्यबीज निर्मिती केंद्र उभारणे, बांबू लागवड, जेटी सुधारणा करणे या महत्त्वाच्या बाबींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आल्याने सिंधुदुर्गातील जनतेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. थोर पुरुषांच्या स्मारकासाठी व हुतात्मा स्मारकांसाठी यावेळी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. तेही चांगलेच आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून विशेष लक्ष देऊन अर्थसंकल्पात किमान जागेसाठी तरतूद करुन चालना देणे आवश्यक होते. ते झालेले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
या चर्चासत्रात जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप गावडे, बाळ खडपकर, देवयानी वरसकर यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी, स्वागत संदिप गावडे यांनी तर आभार बाळ खडपकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Budget for the development of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.